नवी दिल्ली – संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना काही देश मात्र अजूनही आमच्याकडे कोरोना व्हायरस आला नसल्याचा दावा करत आहेत. तुर्कमेनिस्तान, उत्तर कोरिया आणि स्वतंत्र बेटे असलेले तीन छोटे देश अशा एकूण पाच देशात कोरोनाची कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत, असा दावा केला जात असल्याचे मत जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी आणि डब्ल्यूएचओने नोंदविले आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानेही आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे नाकारले आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, येथील सरकार सत्य लपवत असतील, त्यामुळे या साथीला सामोरे जाण्याच्या प्रयत्नांना अडथळा येऊ शकतो. त्याचप्रमाणे तुर्कमेनिस्तानचे कथीत जुलमी अध्यक्ष गुरबांगुली बर्डीमुखमेडोव्ह यांनी कोरोनाचे अहवाल बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचा असा दावा आहे की देशात कोरोनाचे एकही प्रकरण नाही. गुरबांगुली यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाबाबत राजकारण करू नये. गुरबांगुली २००६ पासून तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष आहेत.
दुसरीकडे, तुर्कमेनिस्तानबाहेरील स्वतंत्र संस्था, पत्रकार आणि कार्यकर्ते म्हणतात की, देशाला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. याचे भक्कम पुरावे आहेत. त्यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या ६० हून अधिक लोकांची नावे वैयक्तिकरित्या गोळा केली आहेत. यामध्ये शिक्षक, कलाकार आणि डॉक्टरांचा समावेश आहे. तुर्कमेनिस्तानसोबत खूप मोठी सीमा असलेल्या शेजारच्या इराणला साथीच्या आजाराने मोठा फटका बसला आहे.
त्याप्रमाणे उत्तर कोरिया देशाने डब्ल्यूएचओला असेही सांगितले आहे की, आमच्या देशातील हजारो लोकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या आहेत, परंतु या काळात संक्रमणाचा एकही प्रकरण समोर आलेले नाही. तर दक्षिण कोरिया आणि चीनच्या शेजारी देशांनी आतापर्यंत संक्रमणाची लाखो प्रकरणे नोंदवली आहेत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी उत्तर कोरियाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मात्र उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी सर्व विदेशी पर्यटकांवर बंदी घातली आणि एका आठवड्यानंतर आणीबाणीची स्थिती घोषित केली. शाळा बंद करण्यासारख्या कठोर उपायांची अंमलबजावणी केली. त्यानंतर, नवीन रुग्णालये बांधण्याचे आदेश दिले. तथापि, या काळात त्याने कोरोनाचा कोणताही उल्लेख केला नाही. त्याच वेळी, महिन्याच्या अखेरीस, सरकारने दहा हजार लोकांना अलग ठेवले होते. तरीही आमच्या देशात कोरोना नाही असे उत्तर कोरिया सांगत आहे.