माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
उत्तर भारतात धुक्याचा थर आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा भर अशा पद्धतीचे वातावरण येत्या कालात राहणार आहे. काश्मीर खोरे, हिमाचलमधील अति थंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्ये दिशेकडून सह्याद्री तसेच सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडी उतरणार आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक तसेच नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात येत्या २३ ते २७ डिसेंबर दरम्यान (५ दिवस) चांगलीच थंडी जाणवू शकते. उर्वरित महाराष्ट्रात थंडी असेल पण तीव्रता काहीशी कमी जाणवेल.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे येत्या ३-४ दिवसात ते श्रीलंका किनार पट्टीवरून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत पोहोचेल. नाताळ दरम्यान किंवा त्यानंतर तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्रावर या वातावरणाचा कोणताही परिणाम जाणवत नसून महाराष्ट्रात पाऊस नाही. जास्तीत जास्त दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात क्वचित ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते.
संपूर्ण इंडो गंगेचे मैदानातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार राज्यात घनदाट धुक्याची चादर लपेटलेली असेल. त्यामुळे दृश्यमानता ५० मीटरच्या खाली सरकली आहे. पर्यटनाच्या उच्चतम रहदारी कालावधीत सध्या हवाई वाहतुकीच्या उतरण व उड्डाणावर तसेच रस्ते दळणवळणावर ८-१० दिवस सकाळच्या प्रहरात अडचणी जाणवू शकतील. दोन प. झंजावातात अधिक काळ लोटल्यास न विस्कळणारे धुक्याचे पार्सल (गाठोडे) अति थंडी, आर्द्रता आणि जमिनीलगतच्या उच्च हवेच्या दाबामुळे घनदाट धुक्यातून दळणवळण बाधित तसेच धोकादायक ठरते. उत्तर भारताबरोबर पुर्वोत्तरातील ७ राज्यातही तीव्र नसला तरी धुक्याचा परिणाम सध्या जाणवत आहे.
आजची वातावरणीय ठळकता एव्हढीच!
North Maharashtra Cold Weather Forecast Climate