मुंबई – उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग कुणाला विनवणी करतोय, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. संपूर्ण जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचविण्याचे स्वप्न बघणारा किम जोंग चांगलाच लाचार झाला आहे. कारण त्याच्या देशातील धान्याचे भांडार रिकामे झाले असून जगापुढे भीक मागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
काही महिन्यांपूर्वी किम जोंग आणि त्याचे अधिकारी ही लाचारी मान्य करायला तयार नव्हते. मात्र आता अधिकृतरित्या त्यांनी देशावर उपासमारीचे संकट घोंघावत असल्याचे कबुल केले आहे. किम जोंग सत्तेत आल्यापासून उत्तर कोरियातील नागरिक अत्यंत वाईट दिवसांचा सामना करीत आहे. आता उपासमारीचे मोठे संकट त्यांच्यावर आले आहे. उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्र संघाला पाठविलेल्या अहवालात माहिती दिली आहे की २०१८ मध्ये देशाचे धान्य उत्पादन कमी झाले होते.
नैसर्गिक संकटांमुळे ही स्थिती आल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर शेतीसाठी वापरण्यात येणारी उपकरणेही अत्यंत खालच्या दर्जाची आहेत, असेही उघड झाले आहे. आपल्या देशातील धान्याचे संकट पहिल्यांदाच उत्तर कोरियाने सार्वजनिकरित्या उघड केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने विविध प्रकारचे निर्बंध उत्तर कोरियावर घातलेले आहेत. हे निर्बंध हटविण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
परमाणू शस्त्र आणि मिसाईलच्या चाचणीसाठी उत्तर कोरियाला ही शिक्षा भोगावी लागत आहे. २०१७ मध्येच संघाने त्यांच्यावर विविध निर्बंध लादले होते. यात मर्यादित स्तरावर कच्च्या तेलाची आयात, कापडाची निर्यात, नैसर्गिक गॅस आदींवर निर्बंध आहेत. सोबतच उत्तर कोरियातील नागरिकांना दुसऱ्या देशांमध्ये काम करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
किम जोंग रोडावला
उपासमारीच्या चर्चेसोबत किम जोंगसुद्धा बारीक झाल्याची चर्चा आहे. त्याचे वजन घटल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर त्याचे एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. त्यात तो चांगलाच रोड दिसत आहेत.