तब्बल ६० लाखांच्या पगाराची नोकरी सोडून कुणी चहा विकत असेल तर त्याला वेड्यातच काढले जाईल. पण, नितीन सलुजा या तरुणाने अतिशय भन्नाट अशा चायोस हे स्टार्टअप यशस्वी करुन दाखविले आहे. या स्टार्टअपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे चहा चक्क रोबोट तयार करतो…..
“कुठलही काम लहान नसते, ते काम तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि मनापासून केलंत तर तुम्हाला त्यातही यश नक्कीच मिळते”, ही उक्ती सार्थ ठरवतात नितीन सलुजा. विदेशातील नोकरी सोडून भारताच्या रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या चहाचा कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण करणारे सलुजा हे आजच्या पिढीसाठी खरोखरच मार्गदर्शक आहेत.
शालेय जीवनात अभ्यासात फार रुची नसलेला नितीन आई-वडिलांच्या धाकामुळे केवळ अभ्यास करत असे. इयत्ता नववी, दहावी मध्ये केवळ आपल्या मिल्ट्री मध्ये असलेल्या वडिलांच्या भीतीमुळे त्याने चांगला अभ्यास केला. दहावीला उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर त्याने अकरावी सायन्सला प्रवेश घेतला. आता मात्र त्याची स्वतःहून अभ्यासात रुची वाढू लागली. आणि इयत्ता बारावीला उत्तम टक्केवारी मिळवून तो पास झाला. यासोबतच एन्ट्रन्स एक्झाम मध्ये देखील चांगले गुण मिळाल्याने त्याचा नंबर आयआयटी मुंबई येथे लागला.
आपल्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरला असतानाच त्याने आपल्या काही सिनीअर्स सोबत मिळून एक एज्युकेशनल रोबोट्स स्टार्टअप सुरू केले. ही स्टार्टअप देखील चांगले उत्पन्न कमवू लागले होते. पण यातून त्याला अपेक्षित असलेला पगार मिळत नव्हता. म्हणून त्याने एका आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त केली. याच कंपनीत असताना त्याचा विवाह देखील झाला.
एके दिवशी आपल्या पत्नीसह अमेरिकेतील ह्युस्टन शहरामध्ये असताना एका हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणानंतर त्यांना चहा पिण्याची लहर आली. पण नवीन शहरामध्ये चांगला चहा कुठे मिळेल याबद्दल त्यांना काहीच कल्पना नव्हती. तेव्हा त्यांना भारतातील गल्लोगल्ली असलेल्या चहाच्या टपऱ्यांची आठवण आली. आणि हाच विषय चालू असताना चहाच्या टपरीवर मिळणारा चहा चांगला जरी असला तरी तो हायजेनिक असेलच असं नाही. रस्त्यावर मिळणाऱ्या चहाची चव जरी उत्तम असली तरी तिथे उच्चभ्रू लोकांना शांत बसून गप्पा मारतांना चहा पिणे फारसं शक्य होत नाही. जशा सुविधा, स्वच्छता आणि निवांतपणा हा कॉफीशॉपमध्ये मिळतो तसा कुठल्याही चहाच्या दुकानात पाहायला मिळत नाही.
भारतात चहाचं मार्केट अमाप आहे. महिन्याला ८० हजार कोटी रुपयांचा चहा भारतभरात विकला जातो. जिथे एक कॉफीचा कप विकला जातो तिथे २० चहाचे कप विकले जातात. भारतात १५०० कॉफी शॉपच्या तुलनेत एकही ब्रँडेड चहाचे आउटलेट नव्हतं. चहा हे पेय गरीब-श्रीमंत, तरुण, वयस्क, स्त्री-पुरुष अशा कुठल्याही भेदाच्या पलीकडे असून सगळ्यांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. चहाच्या व्यवसायातून आपला उत्कर्ष होऊ शकतो असं त्याला वाटू लागलं.
नोकरी सुरू असतानाच त्याने संपूर्ण एक वर्ष चहाच्या व्यवसायाचा रिसर्च केला. लोकांची पसंत, नापसंत, आवडी-निवडी या सगळ्याचा त्याने सखोल अभ्यास केला. यातून मार्ग दिसू लागल्यावर त्याने हा प्रस्ताव आपल्या पत्नीला सांगितला. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन त्याला पत्नीकडून मिळाले. हीच कल्पना त्याने ज्या वेळेला आपल्या आई-वडील व बहीण यांना सांगितली तेव्हा आई व बहिणी यांनीदेखील पूर्ण पाठिंबा दर्शवला पण वडिलांना मात्र ही कल्पना फारशी पटली नव्हती. याचे प्रामुख्याने दोन कारण होते. एक म्हणजे भारतात लाखो चहावाले आहेत, त्यांच्यात तुमचा टिकाव कसा लागणार? आणि दुसरे म्हणजे आयआयटीचे लेबल लावून रस्त्यावर उभे राहून चहा विकणार? वडिलांचा विचार जरी स्वाभाविक असला तरी त्यामुळे नितीन थांबला नाही. त्याने प्रयत्नपूर्वक वडिलांची समजूत काढली आणि त्यांचे देखील मन वळवले.
आता मात्र त्याने नोकरी सोडली आणि अगदी झपाटून या व्यवसायाचा अभ्यास करू लागला. या व्यवसायात आपल्या सोबत कोणीतरी असावं म्हणून त्याने आपल्या सोबत शिकत असलेल्या अनेक मित्रांना विचारणा केली. यातच त्याच्या मित्राचा मित्र आणि आयआयटी मधेच शिकलेला राघव वर्मा याची भेट झाली. दोघांचेही विचार जुळले आणि सोबत काम करायचं ठरलं.
४ नोव्हेंबर २०२१ ला त्यांनी आपले पहिले आउटलेट गुरुग्राम येथील आयटी पार्क मध्ये सुरू केले. सुरुवात करण्यापूर्वी आउटलेटचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. या दुकानात चहाच्या पारंपरिक संस्कृती सोबतच नव्या पिढीला आकर्षित करेल असे नाविन्य देखील असेल याची दक्षता घेण्यात आली. इंटेरिअर करतांना उच्चभ्रू लोकांना विचारात घेतले गेले. आत बसून लोक शांततेत, मनमोकळ्या गप्पा मारू शकले पाहिजेत. यासोबतच चहाच्या चवीत कुठलाही बदल होता कामा नये यासाठी चहा बनवायला रोबोट तयार करण्यात आला.
चहा तयार करायला रोबोट ठेवण्यामागे प्रमुख कारण म्हणजे सांगितलेल्या चहाची चव कधीही बदलणार नाही, सगळं प्रोग्राम केले असल्याने नुकसान कमीतकमी होते आणि माणसांचा पगार वाचतो.
रोबोटचा चहा म्हणजे केवळ व्हेंडिंग मशीन मधला चहा नव्हे तर या रोबोट मध्ये खरे व नैसर्गिक घटक वापरून व चहा हा उकळवून तयार करण्यात येतो. म्हणजे अगदी हाताने बनवलेल्या चहाची चव येते. या चायोस मध्ये चहाचे तब्बल १२०० प्रकार उपलब्ध आहेत. रेग्युलर चहाच्या प्रकारांसोबतच अगदी काळी मिरीच्या चहापासून तर व्हॅनिला चहा, आईस्क्रीम चहा, स्ट्रॉबेरी चहा इत्यादी प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि तेही तुम्ही सांगाल त्या प्रमाणात. म्हणजे तुम्हाला जर लेमन चहा हवाय पण त्यात थोडं आलं जास्त हवं आणि त्यात किंचित मिरपूड देखील असावी, असं वाटत तर तुम्ही हे तसंच ऑर्डर करा आणि तुम्हाला त्याच मिश्रणाचा चहा मिळेल. आणि विशेष म्हणजे हे सर्व एक रोबोट तयार करून देतो.
चहा सोबतच ग्राहकाला खायला काय आवडतं याचा देखील विचार त्याने केलाय. कोणाला वडापाव तर कोणाला मटरी, किंवा पिझ्झा किंवा कुकीज असे सर्व पदार्थ या चायोसमध्ये मिळतात. त्यांच्या चहाच्या उत्पन्नाइतकेच उत्पन्न या खाद्य पदार्थांमधून मिळते. हा चहा वाला एक पारंपरिक चहावाला नसून आयआयटीयन होता म्हणून त्याच्या दुकानात परंपरा, नाविण्य आणि तंत्रज्ञान असा त्रिवेणी संगम आहे. चहाच्या चावी सोबतच ग्राहकाला एक उत्तम अनुभव देणे महत्वाचे असते. त्यामुळे आत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रसन्न व नाविन्यपूर्ण वाटले पाहिजे. दुकानातील टेबल खुर्च्यांची मांडणी नियमितपणे बदलली जाते. जेणेकरून नियमित ग्राहकाला देखील नाविन्यपूर्ण वाटले पाहिजे.
जर ग्राहकाला उत्तम सेवा मिळत असेल तर तो रु. १० च्या चहासाठी रु ४०-५० देखील देण्यास तयार होतो. चायोसच्या सर्वच पदार्थांच्या किमती सामान्यपेक्षा जास्तच आहेत, पण आपल्या ब्रँडचे तसेच मूल्य त्यांनी निर्माण केले आहे. २०१२ मध्ये पहिल्या आउटलेटने सुरुवात केल्यावर २०१५ पर्यंत १८ आउटलेट केवळ दिल्ली मध्ये होते. २०१६ मध्ये मुंबई सह एकूण ३३ स्टोअर्स व २०१७ मध्ये ६५ आणि २०१९ अखेर ८० स्टोअर्स भारतातील प्रमुख १२ शहरात उभे केले. पुढील ३ वर्षात भारत व नजिकच्या काही देशांमध्ये ३०० स्टोअर्सचे ध्येय घेऊन ते काम करत आहेत. ह्या प्रवासात त्यांना टायगर ग्लोबल व सैफ इन्व्हेस्टमेंट सिंगापूर यांच्याकडून एकूण २९३ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याच जोरावर पुढील ३ वर्षात भारत व नजीकच्या काही देशांमध्ये ३०० स्टोअर्सचे ध्येय घेऊन ते काम करत आहेत. हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.