नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच खसखस पिकली. यावेळी गडकरी म्हणाले की, पान ठेल्यावर एक जपानी गुडिया असते. कुणी कुठल्याही दिशेने असलं तरी ती डोळा मारायची. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की ती माझ्याकडे बघते. शरद पवारही अगदी असेच आहेत. प्रत्येकाला पाहतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की ते माझ्याकडे बघतात. मग कार्यकर्ते कामाला लागतात, पुढच्या वेळी मीच असं त्यांना वाटत असतं आणि भलत्यालाच तिकिट मिळतं.
भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ता मेळावा काल झाला होता. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवारांना दिलेल्या उपमाचीच नंतर चर्चा रंगली. याअगोदरही नितीन गडकरी यांनी शरद पववारांचे काही किस्से सांगितले आहे. हे दोन्ही नेते एकमेकांच्या गुणांचे कौतुक करतात हे सुध्दा महाराष्ट्राने अनुभवले आहे.
काही दिवसापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोण आहे ? असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना विचारल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं होते. हे सांगतांना त्यांनी ते पक्षीय दृष्टीकोन ठेवत नाहीत. एखादा प्रश्न सांगितला तर कोण सांगतंय यापेक्षा प्रश्न किती महत्त्वाच आहे याकडे त्यांचं लक्ष असतं. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. पण हा अनुभव फक्त त्यांच्याबद्दलच असल्याचेही ते म्हटले.