सुदर्शन सारडा
निफाड तालुका हा भौगोलिक दृष्ट्या पांढरपेशा संस्कृतीचा पाईक म्हणून ओळखला जातो. त्याच संस्कृतीला सहकारात उच्चपराकोटीला नेऊन जमिनीत गाडणारा तालुका म्हणूनही निफाडची ओळख आहे. त्यात राजकीय महत्वकांक्षा या विषयावर बोलायचे झाल्यास सर्वच भागात बागायतपणा टिच्चून भरलेला आहे. निवडून आलेले पुढारी गल्लीतले असो अथवा दिल्लीतले ते आमच्यामुळेच आले असा काहीसा होरा इथल्या काही विशिष्ठ नेत्यांचा कायम राहत आलेला आहे.
आताच्या पिढीला राजकीय चौखुरी बाबत सांगायचे झाल्यास त्याचे मोगल, बोरस्ते, कदम, बनकर असा म्हणता येईल पण अडीच दशकं या तालुक्याला बनकर-कदम असे दोन गट समोरासमोर ठाकलेले चित्र गत दोन दशकांपासून आहे. सुरवातीचे दहा वर्ष रावसाहेब व मंदाकिनी कदम, पाच वर्ष दिलीप बनकर नंतर दहा वर्ष अनिल कदम व पुन्हा दिलीप बनकर या आमदारांना लोकांनी संधी दिली आहे. सध्याच्या विधानसभेला विसर्जित होण्याला काही अवधी शिल्लक असताना विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या माघारी बाबतचे पेव फुटणे म्हणजेच महायुतीत चढाओढ आहे का अशी शंका उपस्थित होणे क्रमप्राप्त आहे.
आमदार बनकर यांनी सुमारे चौदाशे कोटींचा निधी मतदारसंघात आणला असा त्यांचा ठाम दावा आहे. त्यामुळे ते माघारी का घेतील ही शंका मनात असली तरी ती सार्वजनिक झालेली नाही. राजकारण हा सामाजिक दातृत्वाचा भाग असला तरी अलीकडच्या काळात त्यात होणाऱ्या उलाढालीमुळे तो व्यावसायिक रूप धारण करत असल्याचे चित्र राजकीय घडामोडीवरून जाणवते. अशा वातावरणात बनकर हे माघार कसे घेतील हा सवालच नवजात बालकाला डॉक्टर इंजिनीयर संबोधल्या सारखा आहे. या निरर्थक बाबीला बनकर यांचे काही कट्टर समर्थक केवळ हसून उत्तर देत आहे. त्यामुळे महायुतीत बनकर हे प्रबळ उमेदवार असताना त्यास माघारीची किनार लावणे मुळातच तालुक्याला पचणी पडेल का याचे उत्तर स्पष्ट नाही असे आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडे अनिल कदम हे प्रबळ उमेदवार आहेत. उलट कदम यांना जेवढी उध्दव ठाकरेंची पसंती आहे. तितकीच शरद पवारांची देखील आहे. यामुळेच खा.भास्कर भगरे यांच्यासाठी दोन्ही हात वर करत लाखो वेळेस तुतारी वाजवण्याची प्रॅक्टिस केलेले मशाल प्रेमी अनिल कदम सध्या नो कमेंट्स म्हणत आगे देखो..म्हणत आहे. भाजपकडून यतीन कदम हे मतदारसंघात रोज भेटी घेत आहे. महायुतीचा धर्म पाहता निफाडची जागा नेमकी अजितदादा की भाजपला यापैकी कुणाला सुटेल हे सांगणे हायकामांडचे काम असले तरी सध्या मतदार राजाला पाच वर्षांतून एकदा मिळत असलेला मान तो भरभरून पदरात पाडत असून काही जण पायाला स्पर्शित केलेल्या प्रत्येकाला विजयी शुभेच्छा देत आहे.यात प्रहार कडून गुरुदेव कांदे यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास दिवाळी नंतर फटाक्यांची आतिषबाजी पिंपळगाव,ओझर येथे होते की आणखी कुठे हे आताच सांगणे कठीण असले तरी ती कुठेही झाली तरी त्यासोबत गुलाल मोफत मिळणार हे पक्के आहे. सद्यस्थितीत अफवांचा नारळ फोडून ठिकठिकाणी खोबरं वाटप करणाऱ्यांना दिलीप बनकर माघार घेणार नाही हे स्पष्ट आहे. तर महाविकास आघाडी धर्मात अनिल कदम यांचे अनुष्ठान करून झाले असले तरी बनकर,कदम पैकी लोकाभिमुख कायदे बनवायला विधी मंडळात कोण पाऊल ठेवेल इतकेच बेरीज वजाबाकीत शिल्लक लिहिणे राहिलेले आहे. बाकी नो कमेंट्स !