लासलगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – निफाड तालुक्यातील रुई येथील महिला उपसरपंच व त्यांचे पती यांनी वीज वितरण कर्मचाऱ्यास मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी देवगावचे सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत देवगाव येथील सहा.अभियंता दिनेशसिंग राजपूत यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रुई ग्रामपंचायतीकडे नळ पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ५ लाख ३२ हजार ६५० रु. व २ लाख ५४ हजार २१० रुपये थकीत बिल असल्याने सदर ग्रामपंचायतला वारंवार कळवूनही ग्रामपंचायत बिल भरत नसल्याने आम्ही आमचे सोबत कर्मचारी धीरज वैभव जोशी, किरण नामदेव पानसरे, समाधान दगू तनपुरे असे आज दि. २७ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचातीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिर, कोळगाव रोड, कालव्याजवळ, रुई शिवार येथे जाऊन नळ योजनेचे वीज कनेक्शन सहकाऱ्यांमार्फत कट केले. सदर ठिकाणी गावातील उपसरपंच सविता केदारनाथ तासकर व त्यांचे पती केदारनाथ देवराम तासकर दोघे रुई ता.निफाड हे माझ्या जवळ आले व मला म्हणाले की, तुम्ही आमचे गावात येऊन पोलवर चढून वीज कनेक्शन का कट केले? अशी कुरापत काढून मला व माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून तुमचे तंगडे तोडतो असे बोलले. मी त्यांना समजावून सांगितले की, आम्ही वारंवार तुम्हाला सांगितले की वीज बिल भरून टाका तरी तुम्ही भरले नाही म्हणून आम्ही कारवाई केली आहे. त्यानंतर केदारनाथ तासकर आमचे वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता सोनवने साहेब यांच्याशी फोनवर बोलले. सोनवणे साहेबांनी मला ते शुक्रवारी पैसे भरणार आहेत त्यांचे कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडून द्या असे फोनवर सांगितल्याने मी सहकार्यांमार्फत तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडून दिले. त्यानंतरही सविता केदारनाथ तासकर यांनी आम्हाला शिवीगाळ, दमदाटी करून माझे सहकारी धीरज वैभव जोशी यांचे कानामागे हाताचे चापटीने मारहाण केली. आम्ही तेथून निघून जात असताना केदारनाथ तासकर यांनी आमच्या गाडीला आडवे येऊन आम्हाला सदर ठिकाणावरून जाण्यास प्रतिबंध केला, तसेच तुम्ही पुन्हा कसे येता, पोलवर कसे चढता असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. तिथे उपस्थित असलेले भागवत नंदू वाघ यांनी केदारनाथ तासकर यांना बाजूला करून आम्हाला जाऊन दिले. म्हणून माझी वरील लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद आहे. देवगाव येथील सहाय्यक अभियंता दिनेशसिंग राजपूत यांच्या लेखी फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२२ भा.द.वि. कलम ३५३,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दि.२७-७-२०२२,२३/१७ स्टेशन डायरी नं.१८/२२ अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी लासलगावचे सहा.पो.निरीक्षक राहुल वाघ, पो.उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, स.पो.उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस नाईक औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.