नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील भरवस येथील कोतवालाला ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे. लक्ष्मण फकीरा वैराळ असे लाचखोर कोतवालाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे वडिलोपार्जित जमिनीचे खाते वाटप आदेश तहसील कार्यालय, निफाड यांच्याकडून प्राप्त झाले होते. सदर आदेशाप्रमाणे ७/१२ उताऱ्यावर नोंद करणे आवश्यक होते. तसेच, ही नोंद मंजूर करून देण्याकरिता कोतवाल वैराळ याने अर्जदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यात ३ हजार आणि नंतर २ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात वैराळ हा लाच घेताना पकडले गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन एसीबीद्वारे पुढील कार्यवाही सुरू आहे.
या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Niphad Crime ACB Trap Bribe Corruption