नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येत्या १ मे २०२५ पासून सध्याच्या फास्टॅगच्या जागी उपग्रह आधारित पथकर आकारणी प्रणाली सुरु होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसारित झाल्याचे दिसून आले आहे. परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) असा कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे आम्ही स्पष्ट करत आहोत.
पथकर नाक्यावरून पथकर देऊन बाहेर पडण्यासाठी वाहनांना कमीत कमी वेळ लागावा, यासाठी काही निवडक पथकर नाक्यांवर ANPR – फास्टॅग आधारित ‘अडथळामुक्त पथकर प्रणाली’ सुरु करण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक पथकर प्रणालीत ‘स्वयंचलित नंबर प्लेट ओळख’ (ANPR)तंत्रज्ञान अंतर्भूत असून त्याद्वारे वाहनांच्या नंबर प्लेटची नोंद घेऊन वाहनांची ओळख पटवली जाईल व फास्टॅगच्या (RFID ) रेडिओ लहरी ओळख प्रणालीद्वारे पथकर कापून घेतला जाईल. पथकर केंद्रात वाहन न थांबवता देखील उच्च क्षमतेच्या ANPR कॅमेऱ्यातून वाहनांची ओळख पटवून त्वरित फास्टॅगमधून पथकर वळता करून घेतला जाईल. पथकर कापला न गेल्यास अथवा चुकवला असल्यास वाहनधारकांना इ-नोटीस पाठवली जाईल. तरीही पथकर न दिल्यास फास्टॅग रद्द करणे किंवा इतर वाहन संबंधित दंड आकारले जातील.
ही अडथळामुक्त ‘ANPR- फास्टॅग पथकर प्रणाली’ राबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढल्या असून काही निवडक पथकर नाक्यांवर ती सुरु केली जाईल. तिची कार्यक्षमता व वापरकर्ता प्रतिसाद यांचे मूल्यमापन करून नंतर ती प्रणाली देशभरात राबवण्याविषयी निर्णय घेतला जाईल.