नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस असल्याची बतावणी करीत तोतयांनी वृध्देचे सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. मदतीच्या बहाण्याने भामट्यांनी दागिणे पळविले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर.श्यामला रविंद्रन (७० रा.आढावनगर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रविंद्रन या गुरूवारी (दि.१७) सकाळी परिसरातील शिवमंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या सार्वजनिक गार्डन जवळील रेणूका हॉस्पिटल परिसरातून त्या रस्त्याने पायी घरी जात असतांना ही घटना घडली. पोलीस असल्याची बतावणी करीत दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. तुम्ही एवढे सोने गळयात घालून का फिरतात पुढे सोन्यामुळे एकाचा मर्डर झाला आहे. तुम्ही तुमचे सोने सुरक्षीत काढून ठेवा असा सल्ला देत भामट्यांनी कागदात दागिणे काढून पर्स मध्ये ठेवण्यासाठी मदत केली.
यावेळी भामट्यांनी हातचलाखीने गळयातील मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या व अंगठी असे सुमारे २ लाख १० हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.