विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाची दुसरी लाट देशात ओसरत असतानाच एक गंभीर बाब समोर येत आहे. भारतासाठी आगामी ६ ते १८ महिने हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात संसर्गाचे प्रमाण रोखणे आणि लसीकरणाचे आव्हान पेलणे या दोन्ही कसोट्यांवर भारतासराख्या देशांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या अडीच कोटी एवढी आहे. मात्र, हीच संख्या येत्या जून अखेर ३ कोटींपर्यंत पोहचेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिला आहे.
डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या की, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे मोठे आव्हान आहे. कोरोना विषाणूमध्ये सातत्याने मदत होत आहे. त्यातच लसीकरणाची माहिमेला गती देणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. या वर्षाअखेरीस जगभरातील ३० टक्के व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू दर निश्चितच कमी होईल. मात्र, लस घेतलयानंतरही किती व्यक्ती या हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहचतील आणि विषाणूशी लढण्यास सक्षम होतील, हे सांगता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य यंत्रणा बळकट करणे आवश्यक आहे. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राला डॉ. स्वामिनाथन यांनी दिलेल्या मुलाखतीत कोरोना संकटाशी निगडीत अनेक मुद्दयांवर भाष्य केले आहे.
भारतात आढळत असलेला B1.617 हा विषाणू मूळ कोरोना स्ट्रेनपेक्षा अधिक संसर्ग करणारा आहे. त्यातही हा नवा विषाणू दोन वेगळ्या प्रकारांमध्ये विभागला गेला आहे. त्याच्या म्युटेशनमध्ये सातत्याने बदल दिसत आहेत. परिणामी हा विषाणू आणि त्याचा परिणाम किती गंभीर किंवा धोकादायक आहे हे आताच सांगता येणार नाही, असे डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले आहे.