विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गुन्हेगारांनी निवडणुक जिंकणे किंवा निवडून आलेल्या उमेदवारावर अनेक गुन्ह्यांची नोंद असणे ही भारतात काही नवी बाब नाही. पण जेव्हा मंत्रीपद मिळते तेव्हा मात्र याची चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील तब्बल ४२ मंत्र्यांवर विविध गुन्हे असल्याचे एका अहवालातून पुढे आले आहे. म्हणजे केंद्र सरकारचे निम्म्याहून अधिक मंत्री विविध आरोपांखाली गुन्हेगार ठरतात, असे म्हणायला हरकत नाही.
एडीआरच्या अहवालानुसार, केंद्रात ७८ मंत्री असून त्यातील ४२ मंत्र्यांनी त्यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली आहे. यातील ४ जणांवर खूनाचा गुन्हा देखील आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्रीमंडळाच्या पुनर्रचनेत १५ नव्या कॅबीनेट मंत्र्यांनी आणि २८ राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्र्यांची संख्या आता ७८ झाली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने निवडणुकीतील निकालांचा दाखला देत म्हटले आहे की या सर्व मंत्र्यांचा आढावा घेतला असता त्यात ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांनी आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती सादर केली आहे. जवळपास २४ मंत्र्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आपल्यावर असल्याचेही मान्य केले आहे. नवनियुक्त गृहराज्य मंत्री निशिथ प्रामाणिक यांनी खुनाच्या प्रकरणातील गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्यांचे वय ३५ वर्षे असून सर्वांत तरुण आहेत. प्रामाणिक यांच्यासह जॉन बारला, पंकज चौधरी आणि मुरलीधरन यांनीही खुनाशी संबंधित गुन्ह्यांची घोषणा केली आहे.
९० टक्के करोडपती
मोदींच्या मंत्रीमंडळातील ९० टक्के मंत्री म्हणजे ७० मंत्री करोडपती आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती १६.२४ कोटी रुपये आहे. चार मंत्र्यांनी तर ५० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचा उल्लेख केला आहे. त्यात ज्योतिरादित्य सिंधिया, पीयुष योगल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.
हे सर्वांत गरीब
आठ मंत्र्यांनी आपल्याकडे १ कोटी रुपयांपेक्षाही कमी संपत्ती असल्याचे म्हटले आहे. त्यात प्रतिमा भौमिक, जॉन बारला, कैलाश चौधरी, बिश्वेश्व टुडू, मुरलीधरन, रामेश्वर तेली, शांतनू ठाकूर आणि निशिथ प्रामाणिक यांचा समावेश आहे. प्रतिमा भौमिक यांच्याकडे तर अवघ्या ६ लाख रुपयांचीच संपत्ती आहे. त्यादृष्टीने मंत्रीमंडळातील हे सर्वांत गरीब मंत्री ठरतात.