इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका ही प्रेक्षकांसाठी विसाव्याची ठिकाणे असतात. त्यामुळेच त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळते. यामुळेच नवनवीन मालिका करायला निर्मात्यांना उत्साह येतो. मालिका म्हटल्या की सासू – सून यांची भांडण असा समज सर्वच मालिकांनी बदलला आहे. आजची स्त्री ही सोशिक जरी असली तरी ती बंधन, परंपरांचे जोखड तोडून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहणारी आहे. अशा वेगळ्या विषयाच्या मालिका रोज नव्याने दाखल होत आहेत. यातच आता प्रेक्षकांना अजून एका नवीन मालिकेची मेजवानी मिळणार आहे. प्रवाहाविरुद्ध आपला प्रवास सुरू ठेवणाऱ्या एका ध्येयवादी सुनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट घेऊन ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात रोज नव्याने भर पडत आहे. काही दिवसांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेल्या मराठी वाहिन्यांमध्ये भर पडत आहे. मराठी मालिकांमध्ये देखील भर पडत आहे. सन मराठी वाहिनीवर ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका सुरू होत आहे. कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची ही कथा आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलं आहे. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सर्वोत्कृष्ट असावं. तिच्या वडिलांच्या स्वप्नाला आपलसं करत तिने नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत शैक्षणिक क्षेत्रातही अव्वल राहिली आहे.
जगाच्या स्पर्धेत नेहमी सर्वोत्कृष्ट असण्यासाठी वडिलांनी घडवलेली संजीवनी…
लग्नानंतर प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहून साकार करेल का तिची स्वप्नं?नवी मालिका "शाब्बास सुनबाई" आजपासून सोमवार ते शनिवार, दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.#ShabbasSunbai #शाब्बाससुनबाई pic.twitter.com/Zhe2BXilNt
— Sun Marathi (@SunMarathi) November 14, 2022
माहेरी अशी परिस्थिती असलेल्या संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर ? संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का? अशा अनेक प्रश्नांनी गुंफलेली ही मालिका आहे. टॅगलाइन वेगळी असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘शाब्बास सूनबाई’ या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे दिसणार आहेत. शार्दुल सराफ आणि पूर्णानंद वांढेकरने या मालिकेचं लेखन तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान, रश्मी अनपटने आजवर अनेक भूमिका केल्या आहेत. तिच्या भूमिका या कायम आव्हानात्मक राहिल्या असल्या तरी त्यांना तिने उत्तम न्याय दिला आहे. ‘अग्निहोत्र’च्या दुसऱ्या पर्वातील तिची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळे ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षक आतुरतेने या मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. वेगळी कथा आणि उत्तम भूमिका यांची सांगड प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची उत्तम मेजवानी ठरणार यात दुमत नाही.
New Marathi TV Serial Shabbas Sunbai
Entertainment