नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय पातळीवर मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच राजधानीसह बृहन्महाराष्ट्रात मराठी बांधवांच्या सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळानी एकत्रित येऊन देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ स्थापन केला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत गेल्या १२ वर्षांपासून भाजप मध्ये सक्रिय असलेले तसेच राजकीय कामकाजाची जाण व सचोटी असणारे भाजप नेते आनंद रेखी यांना राष्ट्रीय मराठी मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या सर्व राज्यांतील मराठी मंडळ व संघटनांच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत राजधानी दिल्ली सोबतच देशातील प्रत्येक राज्यात मराठी माणसांचे राजकीय नेतृत्व उभे करण्याचा महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. देशातील सर्व राज्यांमधील मराठी लोकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात तरुण व तडफदार चेहऱ्यांच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व दिले जावे, हा राष्ट्रीय मराठी मोर्चा स्थापने मागचा उदात्त हेतू आहे.
“राष्ट्रीय मराठी मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट मराठी समाजातील मान्यवरांना महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये राजकीय चेहरा म्हणून पुढे आणणे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे हे आहे.या प्रयत्नामुळे देशात मोठ्या राजकीय वाटचालीची सुरुवात होईल. भविष्यात योग्य उमेदवारांना पुढे करून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे”, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.आनंद रेखी यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यांच्या व भाषिकांच्या राजकीय संघटना व मोर्चे देखील देशात आहेत. परंतु, ते सीमित राज्यांमध्येच सक्रीय आहेत.मात्र; राष्ट्रीय मराठी मोर्चा हा येणार्या काळात देशातील सर्व राज्यांमध्ये आपल्या शाखांची स्थापना करेल. लवकरच राष्ट्रीय व राज्य पातळ्यांवरील कार्यकारिण्या जाहीर करण्यात येतील, असे आनंद रेखी यांनी स्पष्ट केले.
अभिनेते सचिन खेडेकर यांचे समर्थन
राजधानीसह बृहन्महाराष्ट्रात मराठी संस्कृतीसह राजकीय नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ला अभिनेते सचिन खेडेकर यांनी देखील समर्थन दिल्याची माहिती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेखी यांनी रविवारी दिली. खेडेकर यांच्यासह इतर अभिनेते, अभिनेत्री तसेच राजकीय नेत्यांचे समर्थन येत्याकाळात राष्ट्रीय मराठी मोर्चाला प्राप्त होईल, असा विश्वास रेखी यांनी व्यक्त केला.
New Delhi Rashtiya Marathi Morcha Establishment