विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून कुणाचा समावेश होतो, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यातच आता दोन नावांची निश्चिती झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश आहे. या दोघांनाही दिल्लीवरुन बोलावणे आले आहे. त्यामुळे हे दोघेही तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सायंकाळी शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संभाव्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या गाठीभेटींनाही आज दिवसभर विशेष महत्त्व राहणार आहे. राणे व पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मुंबई आणि कोकण या भागाला आणखी प्रतिनिधीत्व मिळणार आहे.