नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचा मुद्दा गाजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद फैजल यांना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या व्यक्ती चोर असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून संपूर्ण देशभरात गदारोळ सुरू आहे. दरम्यान, गांधी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सत्यासाठी लढणार, मी कुणालाही घाबरत नाही. तसेच मी माफी मागायला सावरकर नाही, गांधी आहे; असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
एकीकडे या मुद्यावर काँग्रेससह इतर विरोधक ठाम असताना दुसरीकडे भाजपने मात्र सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत काँग्रेसला लक्ष्य केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांचा मुद्दा मागे घेण्याची मध्यस्थी केली असतानाच त्यांच्याच पक्षातील नेत्याची खासदारकी परत मिळाल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे. मोहम्मद फैजल यांना १३ जानेवारी २०२३ रोजी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यसह इतर तिघांना एका हत्या प्रकरणात केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजीच त्यांची शिक्षा रद्द केली होती.
फैजल यांनी केली होती तक्रार
शिक्षा रद्द होऊन दोन महिने उलटल्यानंतरही खासदारकी पुन्हा दिली जात नसल्याची तक्रार नोंदवत मोहम्मद फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही होणार होती. मात्र, ही सुनावणी होण्याआधीच फैजल यांची खासदारकी पुन्हा नियमित करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनाही आता खासदारकी परत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल यांना जोवर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट दिलासा देत नाही तोवर काहीही सांगणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1640965489827667970?s=20
NCP Mohammad Faisal Loksabha Membership Restored