कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईडीचं नाव घेतलं की राजकारण्यांना धस्स होतं. कधी आपल्या घरावर छापे पडतील आणि कधी आपल्याला कारागृहात डांबण्यात येईल, याचा काहीच नेम नाही. पण काही दिवस झाले मोठ्या कारवाईची बातमी कानावर पडली नव्हती. आज पहाटेच त्यासाठी मुहूर्त काढण्यात आला आणि स्थळ निवडण्यात आले हसन मुश्रीफ यांचे कागल येथील निवासस्थान.
मुश्रीम आणि त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे झोपेतून उठायचेच असतील, तेवढ्यात ईडी आणि आयकर विभागाचे २० अधिकारी त्यांच्या घरावर धडकले. ही बातमी वाऱ्यासाठी संपूर्ण राज्यात पसरली. आपल्या पक्षातील नेत्याच्या घरावर छापे पडल्याचे कळताच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनाही घाम फुटला. सकाळी साडेसहापासून मुश्रीफ यांच्या घराची झडती घ्यायला सुरुवात झाली. सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. आणि यावेळी कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर सुरक्षा जवानांचा बंदोबस्तही उभा करण्यात आला. घरातील कुणालाही बाहेर पडण्यास परवानगी नव्हती.
प्रकरण काय आहे?
अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले. या बातमीनंतर केवळ राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.
सोमय्या भेटले आणि…
विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा मारणे, या घटनाक्रमाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यामुळे अनेक नेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
१०० कोटी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची वेळ आहे का, अशी शंका व्यक्त होत आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होता, तर हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यामुळे शंभर कोटींचा आकडा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
NCP Leader Hasan Mushrif Home ED Income Tax Raid
EX Minister Kolhapur Kagal IT Enforcement Directorate