इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेख
मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी!
दक्षिण मुंबईत भुलेश्वर परिसरातले मुंबादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी येऊन मनापासून दर्शन घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते, असे म्हणतात. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईचे नाव ज्या देवीवरुन तयार झाले त्या मुंबादेवीचा इतिहास मनोरंजक आहे.
मंदिराचा इतिहास
मुंबादेवी मंदिर १७३७ मध्ये मेंजिस नावाच्या ठिकाणी होते. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (इंग्रजांच्या काळातले व्हिक्टोरिया टर्मिनस) हे रेल्वे स्टेशन आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली भव्य इमारत आहे. इंग्रजांनी मंदिराचे मरिन लाइन्स पूर्व येथील बाजारपेठेच्या परिसरात स्थलांतर केले. ज्यावेळी मंदिराचे स्थलांतर झाले त्यावेळी मंदिराजवळ तीन मोठे तलाव होते. मुंबईची लोकसंख्या वाढली. बाजारातली वर्दळ वाढली. मुंबईत जागेची टंचाई निर्माण झाली. ही टंचाई दूर करण्यासाठी तलाव बुजवून तिथे जमीन तयार करण्यात आली. या जमिनीचा वापर मुंबई शहरासाठी झाला.
मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे.
मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले असल्याचा समज आहे. मुळात मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती. मंदिराचा इतिहास जवळपास ४०० वर्षांचा आहे. असे सांगतात की या मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. देवी समुद्रापासून मुंबईचे आणि भक्तांचे रक्षण करते असा विश्वास मच्छीमारांना वाटत होता. बाजारपेठेत मंदिर स्थलांतरित झाले त्यावेळी बाजारातील व्यावसायिक आणि तिथे नियमित येणारे ग्राहक देवीचे दर्शन घेऊ लागले. देवीचा आशीर्वाद मिळाला तर दिवस छान जातो. आर्थिक लाभ होतो, हा विश्वास वाढीस लागला. अनेकजण देवीसमोर नवस बोलू लागले. इच्छा पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. यातून मंदिरातील रोजची गर्दी वाढत गेली.
मंदिर स्थलांतर
मुंबादेवी मंदिराचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला त्यावेळी पांडू शेठ यांनी स्वतःची जमीन दिली होती. याच कारणामुळे अनेक वर्षे मंदिराची देखभाल पांडू शेठ यांचे कुटुंब करत होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानंतर मंदिराची देखभाल एका ट्रस्टद्वारे (विश्वस्त संस्था ) सुरू झाली. आता या ट्रस्टद्वारे मंदिराची देखभाल केली जाते. ट्रस्टने मंदिरात नारिंगी रंगाच्या मुंबादेवीच्या शेजारी अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीच्या मूर्तीची स्थापना केली. मुंबादेवी मंदिरात, मुंबादेवी देवीच्या प्रतिमेशिवाय गणेश ,इंद्र आणि हनुमानाच्या मूर्ती देखील आहेत.
मुंबादेवीचा वार, मंगळवार
दररोज मुंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. मात्र मंगळवारी दर्शनासाठी अलोट गर्दी असते. मंगळवारी मुंबादेवीचे दर्शन घेणे सर्वाधिक लाभदायी आहे, असे भक्त सांगतात. मुंबादेवीचे मनापासून दर्शन घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते, असे म्हणतात. काही भक्त देवीचे दर्शन घेतल्यानंतर स्वतःची आठवण म्हणून मंदिरातील लाकडी पट्टीवर एक नाणे खिळ्याने ठोकून बसवतात. अशी अनेक नाणी आजही मंदिरातील लाकडी पट्टीवर दिसतात.
दिवसातून सहावेळा आरती
मुंबादेवीची दररोज दिवसातून सहावेळा आरती होते. मंदिरात १६ पुजारी कार्यरत आहेत. देवीची पूजा, आरती, देवीला प्रसाद दाखवणे हे सर्व विधी करण्यासाठी पुजारी कार्यरत आहेत. मुंबादेवीला दररोज भात, भाजी आणि मिठाई यांचा प्रसाद दाखवण्याची पद्धत आहे. संध्याकाळची आरती झाल्यानंतर पुजाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छता करुन मंदिर बंद करतात. दररोज पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात. मंदिराच्या कळसावर एक झेंडा असतो. दर महिन्याला हा झेंडा बदलतात.
मुंबई, बंबई, बॉम्बे आणि पुन्हा मुंबई
मच्छीमारांनी स्थापन केलेल्या मुंबादेवीवरुन शहराला मुंबई असे नाव पडले. मुंबा आणि आई यातून मुंबई या शब्दाचा जन्म झाला. इंग्रजांच्या काळात मुंबईला बंबई आणि बॉम्बे या दोन नावांनी नव्याने ओळखू लागले. इंग्रज गेले तरी शहराची जुनी नावंच कायम होती. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली. यानंतर १९९५ मध्ये शहराचे नाव सर्व भाषांमध्ये मुंबई (Mumbai) असे वापरण्याचा निर्णय झाला.
Navaratri Festival Mumbadevi by Vijay Golesar