इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेख
लोणावळ्याची एकविरा आई
एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून केली जाते.
एकविरा देवी या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत आहे. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. ही देवीजागृत आहे अशी श्रद्धा आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
दंतकथा
पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
स्थान
मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे.
धार्मिक स्थळाच्या विकासाला गती
या देवस्थानची व्यवस्था श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट पाहते. गडावर वीज,भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, पायथा ते गडापर्यंत पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून, प्रस्थानद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाचे सुंदर नक्षीदार प्रवेश व प्रस्थानद्वार बसविण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात नित्यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्यात येतो. तर पौर्णिमा आणि आमावस्येच्या आदल्या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक केला जातो. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठा उत्सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते.
कसे याल
लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत.
Navarastri Festival Special Article Lonavala Ekvira Mata by Vijay Golesar
Karla