सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी आज सुरगाणा तालुका तालुक्यात भेट देऊन येथे ग्रामपंचायत सुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व पंचायत समिती सुरगाणा येथे भेट दिली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने सदर वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरगाणा तालुक्यास भेट देऊन पंचायत समिती सुरगाणा येथे आढावा बैठक घेतली यामध्ये राज्य शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमची प्रभावी अंमलबजावणी करावी, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा १००% विनियोग करावा, घरकुल योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करतांना लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, याबाबत गट विकास अधिकारी यांनी दररोज आढावा घेऊन घरकुल योजनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना यावेळी केल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथे भेट देऊन पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप राऊत हे अनधिकृत गैरहजर असल्याचे आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा समाप्तीचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांना दिले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध साठा व रुग्णांशी चर्चा करून मिळणारे उपचार याबद्दल माहिती घेतली. ग्रामपंचायत सुळे येथे भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने केल्या कामाची पाहणी केली, यावेळी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासंबंधी केलेल्या उपायोजनांची माहिती घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावाने सुळे ग्रामपंचायतीचा आदर्श घेत काम करावे असे सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉ. वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी महेश पोतदार यांच्यासह तालुकास्तरीय विभागप्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.