नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागातील घरकुल बांधकामासाठी ‘संपन्न घर’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कमी खर्चात दर्जेदार घरे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा परिषदेने घर बांधकामाशी संबंधित १९ संस्था व संघटनांशी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक घरे मिळणार असून, घरकुल बांधकामाचा दर्जाही उंचावला जाणार आहे. यावेळी क्रेडाईचे जितेंद्र ठक्कर, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे एड. नितीन ठाकरे, क्वालिटी सिटी नाशिकचे हेमंत राठी, आर्किटेक्ट असोशिएशनचे कृणाल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे आदि उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, राज्यात सर्वाधिक घरकुलांचे उद्दिष्ट नाशिक जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संस्था व संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊ शकतो. यामुळे अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळू शकतो. आजच्या सामंजस्य करारामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सुंदर, सुरक्षित आणि टिकाऊ घरे देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावेळी क्रेडाईचे जितेंद्र ठक्कर यांनी या उपक्रमतील सर्व सहयोगी संस्था व संघटना यांनी एकत्र येत आपल्या संकल्पना मांडत घरकूल योजनेसाठी सहकार्य करावे, आगामी काळत आपल्या सहकार्यातुन ग्रामीण भागात उत्कृष्ठ घरे तयार करून संपन्न घर हा उपक्रम देशात नावाजला जाईल असा आशावाद व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी व वास्तु विशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेता येईल विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून ग्रामीण भागातील घरे विकसित केली जाऊ शकता असे मत मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. इंजिनियर असोशिएशनचे वेदान्त राठी यांनी आपण सर्व सहयोगी संस्था एकत्र येऊन या उपक्रमात सहकार्य करू असे सांगितले.
‘संपन्न घर’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषत: पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे घरांची मजबूती वाढेल तसेच निसर्गस्नेही आणि दीर्घकाळ टिकणारी घरे बांधता येतील. जिल्हा परिषद आणि संबंधित संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे अभियान यशस्वी होण्यास मदत होईल. यावेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी , गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे, सचिन गुळवे, अनिल कडभाने, अतुल बोहरा, नरेंद्र भूसे, मयूर पांडे, अमित पाटील, संदीप कुयटे, अजिंक्य वाघ, हर्षद भामरे, आशिष कटारिया, रोहन जाधव, मिलिंद शेते यांच्या सह आर्किटेक्ट, अभियंते, बांधकाम तज्ज्ञ तसेच संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जीवन अधिक समृद्ध होईल
‘संपन्न घर’ अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार असून, जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प या माध्यमातून पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी उत्तम घरे मिळतील आणि त्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक