येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांदा दर वाढ रोखण्यासाठी निर्यात शुल्क ४० टक्के केले आहे.यामुळे शेतकऱ्यांना कांद्यातून नफा तर सोडाच केलेला खर्चही मिळणार नाही. शेतकरी हितासाठी उन्हाळ कांद्याला क्विटलला २४१० रुपये नव्हे तर चार हजाराचाच भाव योग्य आहे अशी मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी केली आहे. राष्टवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. तसेच या प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दिवसापूर्वी केंद्रातील भाजपा सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के केल्यामुळे कांदा भाव हे सरासरी १४००-१५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरकारने शेतकरी विरोधी घेतलेला हा निर्णय अतिशय तुघलकी आहे.नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपून गेली असून शेतकऱ्याचे खरीपात १०० टक्के नुकसान झाले आहे.त्यातच येवला तालुक्यात दुष्काळाची भीषण दाहकता आहे. शेतकरी खर्च करून बसलेला असताना खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. कांद्यातून अधिकचा नफा तर सोडा केलेला खर्च देखील निघणे शक्य नाही.त्यातच मागील वर्षी साठवणूक केलेल्या कांद्याला कुठेतरी समाधानकारक भाव मिळण्यास सुरवात झालीच होती तर त्यात केंद्र सरकाने ४० टक्के निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
शेतकऱ्यांच्या संतापामुळे आज केंद्र सरकारने आज नाफेड मार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे खरेदी करण्याचे जाहीर केले परंतु यातून शेतकऱ्याच्या हाती फार काही लागेल असे दिसत नाही. आपण सुचवल्या प्रमाणे निर्यात शुल्क कमी करून ४ हजार रुपये प्रती क्विंटल दराने कांदा खरेदी केला तर शेतकऱ्याला काही जादाचे पैसे शिल्लक राहतील असे शिंदेनी म्हटले आहे.
साहेब आपणच यात मार्ग काढू शकता असा विश्वास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे.आपण कृषी मंत्री असतांना कायमच शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे.म्हणूनच शेतकऱ्यांना आपणाकडून अपेक्षा आहे.आपण स्वतः कांदा व टोमॅटो प्रश्नी लक्ष द्यावे व या शेतकरी विरोधी केंद्र सरकारला निर्यात शुल्क वाढीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे हि संबंध कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विनती करत असल्याचे शिंदेनी या पत्रात म्हटले आहे.
Nashik Yeola Onion Issue Solution Agriculture Farmer