येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठलाही दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्याच डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांद्याचीच होळी करीत आपला संताप व्यक्त केला आहे.
येवला तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आपल्या दीड एकर शेतातील कांद्याला अग्निडाग दिला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका डोंगरे यांनी छापल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हतबल झाले आहेत. नेहमीच पिकाची काळजी घेणाऱ्या महिला शेतकरीही स्वतःच्या हाताने कांद्याची होळी करत असल्याचे चित्र यानिमित्ताने पहायला मिळाले गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी विविध माध्यमातून आपला संताप व्यक्त करीत आहेत.
असे आहे कांद्याचे गणित
कांद्याला एका एकराला सरासरी ८० ते ९० हजार रुपये खर्च येत आहे. आणि कांद्याला सध्या ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आल्यानेही कांद्याचे दर कोसळल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्याचाही फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.
Nashik Yeola Farmer Onion Crop Burn Today