नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगावरील सोन्याच्या दागिण्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात काम करीत असतांना दुचाकीस्वार वाटसरूने महिलेचा उपरण्याने गळा घोटला असून, सुतावरून स्वर्ग गाठत अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मुखेड ता. येवला शिवारात घडली होती. या उत्कृष्ट तपासाची पोलिस अधिक्षकांनी दखल घेतली असून तपासी पथकास २५ हजाराचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश भगवान गिते (३४ रा.महालखेडा ता. येवला) असे महिलेच्या खून प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मुखेड शिवारातील नवीन कॅनोल लगत असलेल्या उसाच्या शेतात गेल्या शनिवारी (दि.२१) महिलेच्या हत्येचा प्रकार समोर आला होता. वैभव बाळासाहेब आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून येवला तालुका पोलिस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या आहेर यांच्या आईला अज्ञात मारेकऱ्याने शेतात ओढून नेत जीवे ठार मारले होते. या घटनेत महिलेच्या गळ्यातील व अंगावरील अलंकार हल्लेखोराने पळवून नेल्याचे समोर आले होते. या घटनेची पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी गंभीर दखल घेतल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.
मालेगावचे अप्पर अधिक्षक अनिकेत भारती,उपविभागीय अधिकारी प्रदिपकुमार जाधव, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच येवला तालुक्याचे निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबरोबरच घटनास्थळी फॉरेन्सिक टिम व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. स्थानिक कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखा आरोपीच्या मागावर असतांनाच यापूर्वीच्या घटनांचा तपशील पोलिसांनी तपासला असता संशयित पोलिसांच्या हाती लागला. २०१८ मध्ये याचप्रकारचा गुन्हा घडलेला असल्याने पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असता ही घटना उघडकीस आली.
शनिवारी भरणाऱ्या मुखेड गावच्या आठवडे बाजारासाठी संशयित जात होता. कॅनाल जवळून दुचाकीवर प्रवास करीत असतांना संशयिताला शेतात एकटी काम करणारी महिला दिसली. दुचाकी थांबवत त्याने महिलेस गाठून दागिण्यांची मागणी केली मात्र महिलेने त्यास शिवीगाळ करीत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. संतप्त संशयिताने झटापट करीत तिला ऊसाच्या शेतात ओढून नेले. याठिकाणी त्याने उपरण्याने गळा आवळून महिलेचा खून केल्याची कबुली दिली असून यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व कानातील कर्णफुले काढून घेत पोबारा केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
संशयिताने घटनेप्रसंगी वापरलेले कपडे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितास मुद्देमालासह येवला तालुका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. कुठलाही धागा दोरा नसतांना अवघ्या ४८ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने या खूनाचा उलगडा केल्याने अधिक्षक उमाप यांनी स्वागत केले असून, तपास पथकास २५ हजाराचे बक्षीस जाहिर केले आहे. ही कारवाई निरीक्षक हेमंत पाटील, जमादार रविंद्र वानखेडे, हवालदार नवनाथ सानप, जालिंदर खराटे, उदय पाठक, प्रशांत पाटील, नंदू काळे, पोलिस नाईक विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, सागर काकड, प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम व चालक बापू खांडेकर आदींच्या पथकाने केली.
Nashik Yeola Crime Women Murder Police Investigation