नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या जवळपास निम्म्या भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गेल्या तीन दिवसांपासून सातपूर, सिडको, महात्मानगरसह अनेक भागात पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच ही संधी साधून टँकरचालकांनी आता दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळेच ५०० रुपयांचा टँकर थेट ३ हजार रुपयाला मिळत आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारावर महापालिका किंवा शासकीय यंत्रणांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नाशिककरांची सध्या मोठी परीक्षा सुरू आहे.
सातपूर त्र्यंबक रोड, येथील अमृत गार्डन चौकातील 1200 मी.मी.व्यासाची पीएससी सिमेंटची पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात अचानक गळती सुरू झाल्याने, दिनांक 23/08/2022 रोजी सकाळी पाईपलाईन दुरुस्ती कामी ताबडोब हाती घेण्यात आले. पाईपलाईन गळतीचे काम हे 25 फुट खोल असुन पावसाळा सुरु असल्याने पावसात काम करावे लागले. तसेच पाईपलाईन गळती ही मुख्य पाईपलाईनवर असल्याने पाणी पुरवठा बंद करुन पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे लागले. सदर दुरुस्तीचे काम अविरत सुरु आहे. कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने पाईपलाईन गळती पुर्णपणे बंद होत नसल्याने पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झाली आहे. पपया नर्सरी चौकातील पाईपलाईनवरील क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. सदर दुरुस्तीच्या कामासाठी २७ आणि २८ ऑगस्टला पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने यापूर्वीच कळविले होते. मात्र, हा निरोप ऐनवेळी देण्यात आल्यामुळे नागरिकांना पाण्याची कुठलीही पर्यायी सुविधा करता आली नाही.
सिडकोतील या भागात पाणीबाणी
जुना प्रभाग क्र.25- इंद्र नगरी, कामठवाडे गांव व परिसर
जुना प्रभाग क्र.27- अलिबाबा नगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्त नगर, कारगील चौक, चुंचाळे गांव परीसर
जुना प्रभाग क्र.28- लक्ष्मी नगर, अंबड गांव व परिसर, माऊली लॉन्स परिसर, वृंदावन नगर, अंबडगांव ते माऊली लॉन्स मधील पुर्व व पश्चिमेकडील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
जुना प्रभाग क्र.11 – सातपुर कॉलनी, पपया नर्सरी परीसर, त्रंबकरोड परीसर, महाराष्ट हाऊसिंग कॉलनी, सातपुर गाव, स्वारबाबा नगर, महादेववाडी, जे.पी.नगर, सातपुर मळे विभाग, संतोषीमाता नगर, गौतम नगर, कांबळे वाडी, सातपुर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिवकॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग विकास कॉलनी.
जुना प्रभाग क्र 26 – मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक, आय.टी.आय.परिसर, खुटवड नगर मटाले नगर, आर्शिवाद नगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुल .
सिडकोचा हा भाग पाण्यापासून वंचित
जुना प्रभाग क्र.12 मधील लवाटे नगर, संभाजी चौक, उषा किरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवास नगर, राहुल नगर, मुंबई नाका परीसर मिलिंद नगर, मातोश्री नगर, महेश नगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसर, वनविहार कॉलनी, संतकबीर नगर, पारिजात नगर, समर्थ नगर महात्मानगर परिसर
टँकरचालकांकडून लूट
महापालिकेचा पाणीपुरवठा ठप्प असल्याने टँकरला मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे त्याचे दरही कित्येक पटीने वाढले आहेत. मागणी आणि पुरवठा याचे संतुलन बिघडल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे टँकरचालकांचे म्हणणे आहे. शहरात मर्यादित स्वरुपात टँकर आहेत. तसेच, मागणी अधिक आहे. शिवाय कर्मचारीही अत्यल्पच आहेत. त्यामुळे अधिक पुरवठा होत नसल्याने ५०० रुपयांचा टँकर थेट ३ हजार रुपयांना दिला जात असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात काही टँकरचालकांशी संपर्क केला असता त्यांनी बोलणे टाळले आहे. मात्र, माहापिलेकेने याची दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा आणि टँकरचालकांवर लगाम घालावा, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.
Nashik Water Supply Tanker Rate Hike
3 Days NMC Municipal Corporation No Water Cidco Satpur