इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग ८
एज्युकेशनल हब
मित्रांनो, आपण सर्व लहानपणा पासुन ऐकत आलेलो आहोत की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे आणि जगभरातून विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी येतात. परंतु आता एकूण काय परिस्थिती आहे आणि पुण्यातील शैक्षणिक वातावरण कसे आहे? आपल्या परिवारातील कुठली व्यक्ती मागील काही वर्षांत पुण्याला जाऊन आलेली आहेत का? माझ्या जवळच्या नात्यातील दोन विद्यार्थ्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि वर्षभरातच कॉलेज सोडून घरी निघून आले. पुण्यातील शिक्षणाचे स्तर मागील काही वर्षांमध्ये अतिशय खालावलेले आहे हे आपण सर्व जाणतोच आणि ही कदाचित नाशिकसाठी एक सुवर्णसंधी असू शकते.
आपले नाशिक, ‘मुंबई, पुणे आणि नाशिक’ ह्या सुवर्ण त्रिकोणामधील तिसरे आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक महत्वाचे शहर. नाशिक उत्तम हवा, पाणी, आल्हाददायक वातावरण असलेले, आध्यात्मिक तीर्थक्षेत्र, कुंभनगरी आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र. नाशिक मध्ये ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ (YCMOU) आणि ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ (MUHS) अशी दोन शासकीय विद्यापीठे आहेत शिवाय ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (U.G.C.) मान्यताप्राप्त एक खासगी ‘संदीप विद्यापीठ’ देखील आहे. नाशिक परिसरात सुमारे १५ इंजिनीरिंग कॉलेज, १७ पॉलीटेक्निक कॉलेज, १९ मॅनेजमेंट कॉलेज, फार्मा, मेडिकल, होमिओपॅथी, आयुर्वेद, डेंटल, आर्कीटेक्चर, ऍग्रीकल्चर, बी.एड., लॉ कॉलेजेस, ‘आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्स’ ची साधारण शंभर एक कॉलेजेस, शिवाय आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या डझनभर शाळा आहेत. इतक्या जमेच्या बाजू असतांना देखील नाशिक हे शिक्षणाचे माहेर घर का होऊ शकत नाही?
आपल्या नाशिक मध्ये “मराठा विद्या प्रसारक समाज (१९१४)”, “गोखले एज्युकेशन सोसायटी (१९१८)”, “नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ (१९१८)”, “नाशिक एज्युकेशन सोसायटी (१९२३)”, “युथ एज्यूकेशन आणि वेलफेयर सोसायटी (१९२८)”, “श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी (१९३२)”, “सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (१९३७)”, “बाळ विद्या प्रसारक मंडळ (१९४७) “, “महात्मा गांधी विद्यामंदिर” (१९५२), “क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था (१९६९)”, के.के.वाघ एज्युकेशन सोसायटी (१९७०)”, “मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (१९८९)”, इत्यादी नामांकित आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्था गेल्या कित्येक दशकांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. नाशिक मध्ये मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नावात जरी महाराष्ट्र असले तरी त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभरात आहे.
विद्यापीठाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने “एज्युसॅट” उपग्रहामार्फत आपली शिक्षण प्रणाली विकसित केलेली असून इंटरनेट द्वारेही व्हिडीओंच्या माध्यमातून देखील विद्यापीठाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय फिरत्या शैक्षणिक व्हॅनमार्फत दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागात देखील शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यशासनाच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच “महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था” ह्या इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे.
काही दिवसांपूर्वी व्हाट्सअँप वर व्हायरल झालेल्या नाशिक जिल्ह्यामधील एका शाळेच्या व्हिडीओकडे माझे लक्ष गेले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ‘हिवाळी’ या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा देशभरात चर्चेत आलेली आहे आणि त्याच कारण असे कि ही शाळा वर्षभर म्हणजे ३६५ दिवस, आणि रोज १२ तास सुरू असते. येथील विद्यार्थी रोज फक्त शाळेत जात नाहीत तर अभ्यासही शाळेतच करतात, त्यांना तब्बल हजारपर्यंतचे पाढे, भारतीय संविधानातील कलमे, राष्ट्रीय महामार्ग, जगभरातील देशांच्या राजधान्या देखील तोंडपाठ आहेत. शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही अचूक देतात.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते, शिवाय स्पर्धा परीक्षांकरीता त्यांची लहानपणापासूनच तयारी करून घेतली जाते. याशिवाय येथील विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याची कलाही अवगत आहे. ग्रामीण भागामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडे लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन अनेकदा नकारात्मक असतो. परंतु येथील शिक्षक, विद्यार्थी आणि गांवकरी यांनी सकारात्मक प्रयत्न, समर्पित दृष्टीकोन आणि नावीन्यपूर्व उपक्रम ह्यामुळे ‘हिवाळी शाळेला’ एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
नाशिक मधील सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, गोंदे, इगतपुरी, विंचूर इत्यादी औद्योगिक वसाहती मधील इंडस्ट्रीज मध्ये कुशल मनुष्यबळाची नेहेमी कमतरता असते. नाशिक मधून शिक्षण घेणारी हजारो मुले दरवर्षी नोकरी साठी मात्र मेट्रो शहरांकडे धाव घेतात किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. नाशिक सर्व शिक्षण संस्थांनी उद्योजकां सोबत करार करून इंडस्ट्रीच्या गरजे नुसार कुशल मनुष्यबळ घडविणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या इएसडीएस कंपनीने संदीप विद्यापीठा सोबत करार करून “पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अडवान्सड क्लाऊड कॉम्पुटिंग” आणि “बी.टेक. इन क्लाऊड टेकनॉलॉजी अँड इन्फॉर्मशन सिक्युरिटी” हे नाविन्यपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानवर आधारित विशेष अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत आणि त्याला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद देखील आहे.
संदीप विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सायन्स, टेकनॉलॉजी आणि इंजिनीरिंग ह्या विषयात २२५ पेटंट्स आणि शंभरावर कॉपीराईट्स घेतलेले आहे ही खूप प्रशंसनीय बाब आहे. इएसडीएस चे इतरही अनेक इंजिनीरिंग कॉलेजेस मध्ये “सेन्टर ऑफ एक्सलेन्स” असून आम्ही नियमितपणे कॉलेजेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी जसे कि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, आय. ओ. टी तंत्रज्ञान, क्लाऊड कॉम्पुटिंग, डेटा सेंटर नेटवर्क, सेकुरीटी, डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन इत्यादी विषयांवर व्याखाने आणि प्रशिक्षण देत आहोत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अनुसार, आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणे आणि त्याचा वापर करणे आवश्यक आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मशन हि काळाची गरज असून प्रत्येक शिक्षण संस्थेस डिजिटलायझेशन करणे आवश्यक आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट भारताला ‘जागतिक ज्ञान महासत्ता’ बनविणे हे आहे. येत्या काळात परदेशी विद्यापीठे भारतात येतील त्याकरिता आपण आतापासूनच स्पर्धा पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. शिक्षणावर खर्च होणारा निधी हि भविष्यातील गुंतवणूक आहे. काळाच्या गरजेनुसार, शाळा आणि कॉलेजेस मध्ये करिअर केंद्रित अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, सॉफ्टस्किल, स्टार्टअप उद्योग, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, फंड मॅनॅजमेन्ट, इन्वेस्ट्मेन्ट्स, प्लेसमेंट्स संबंधित माहिती आणि प्रशिक्षण केंद्र असणे सुद्धा आवश्यक झाले आहे.
नाशिक मधील नावाजलेली मस्ती की पाठशाला, एस्पालियर स्कुल, वीस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, फ्रावशी अकादमी, अशोका युनिव्हर्सल स्कुल, दिल्ली पब्लिक स्कुल (DPS), होरायझॉन अकादमी, पोद्दार, सिम्बायोसिस, कॅम्ब्रिज, ऑर्चिड, झेवियर्स, रायन, न्यू इरा, रासबिहारी, निर्मला कॉन्व्हेंट, बॉयज टाऊन, भोसला मिलिटरी स्कुल, गुरु गोविंद स्कुल, श्री स्वामी नारायण इंग्लिश मीडिअम स्कुल इत्यादी अनेक संस्था खूप चांगले उपक्रम राबवित असून त्यांनी आपला शैक्षणिक दर्जा हि कायम राखला आहे. आपण अश्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या स्थानिक शाळा, संस्थापक, ट्रस्ट, शाळा मालकांचे कौतुक करायला हवे. शहराच्या विकासासाठी निरोगी स्पर्धा आवश्यक आहे, त्यांच्या एकमेकांशी निरोगी स्पर्धेमुळे नाशिकचा शैक्षणिक दर्जा पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पोहोचण्यास मदत झाली आहे, हे नमूद करायला हवे. आमच्या शाळा आता भारतातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळांपेक्षा चांगल्या आहेत. शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी, रतन लथ, रितू अग्रवाल, सिद्धार्थ राजगढिया, जेष्ठ उद्योजक अशोक कटारिया, संदीप झा यांचे ह्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे.
कोरोना-१९ आणि लॉकडाउन मुळे आपल्याला “ऑनलाईन शिक्षणाची” ओळख झाली, शिक्षण संस्थाचे स्वरूप आणि शिकविण्याची पद्धत ही बदलली. विशेषतः ग्रामीण भागामध्ये कॉम्पुटर, मोबाईल, इंटरनेट नेटवर्क, विजेची समस्या आणि तांत्रिक मर्यादे अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा झाले. शिक्षणाच्या आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातही पोहोचायला हव्यात. शिक्षणामध्ये उत्तम नागरिक घडविण्याची तसेच मनुष्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ही ताकद आहे. येत्या काही वर्षांमध्ये ‘ऑनलाईन आणि हायब्रीड’ शिक्षणाचे प्रमाण वाढणार आहे. नाशिक ‘स्मार्ट सिटी’ करतांना शिक्षणा संबंधित समर्पित संस्था, तज्ञ व्यक्ती, शासन यांनी एकत्र येऊन डिजिटल पायाभूत सुविधा, हाय स्पीड इंटरनेट, दर्जेदार संसाधने, डिजिटल लायब्ररी, आभासी (व्हर्चुअल) प्रयोगशाळा, विविध विषयांना समर्पित ‘एज्युकेशन झोन’ निर्माण करणे आवश्यक आहे.
नाशिकचा “ग्रेप आणि वाईन कॅपिटल” म्हणून सर्वत्र नावलौकिक असून कृषी आणि वायनरी व्यवसायाला समर्पित असे विद्यापीठ व्हायला हवे, ज्यामुळे कृषी उत्पादने, त्यावरील प्रक्रिया करणारे उद्योग, रोजगार व संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. नाशिक मध्ये सतत चित्रपट, टी. व्ही. मालिका, वेबसिरीज यांचे शुटिंग सुरु असते, ज्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दिला जातो असे चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नाशिककर होते, त्यांचा नावाला साजेसे फिल्म ट्रैनिंग इन्स्टिटयूट (फिल्म सिटी) नाशिक मध्ये होणे गरजेचे आहे.
मुंबई, पुणे सारख्या शहरात जमिनीच्या किंमती खूप वाढलेल्या आहेत, तिथे राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च, रहदारीच्या समस्यांमुळे वेळेचा होणारा अपव्यय, प्रदूषण, आरोग्य विषयी समस्या इत्यादी अनेक बाबी आहेत, त्या तुलनेने आपले नाशिक शहर खूप चांगले आहे. संपूर्ण देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नाशिक मध्ये आकर्षित करण्यासाठी जगभरातील, उत्तमोत्तम कोसेर्स, परदेशी भाषांचे पर्याय, कौशल्य आधारित दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रगत व उदयोन्मुख तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास येत्या काही वर्षांत नाशिक संपूर्ण भारताचे “एज्युकेशनल हब” बनू शकेल ह्यात शंका नाही. नाशिक हे शिक्षणाच्या माहेरघरासाठी लागणाऱ्या सर्व क्षमतांनी परिपूर्ण असून उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वांनी एकत्रितपणे सकारात्मक प्रयत्न आणि नाशिकचे ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
श्री पियूष सोमाणी (सहलेखक – श्री विशाल जोशी)
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik Vision Education Hub Opportunities by Piyush Somani