नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पहाटेपासून नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला नाशिककरांना अवकाळी पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांत बदललेल्या वातावरणाने शेतकऱ्यांच्या पिकाचंही नुकसान झालं आणि दुसरीकडे होळीच्या आनंदावरही विरजण पडले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शहराच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पहाटे ३ पासून गायब झालेली वीज सकाळी साडेअकरा पर्यंतही अनेक भागात आलेली नाही. त्यामुळे नाशिककरांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच होळीवर पावसाचे सावट असणार आहे, याचा अंदाज दिला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला आणि रविवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्रभर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. रविवारी पहाटे सुरू झालेल्या रिमझीम पावसाने मध्यरात्री आक्राळविक्राळ रूप धारण केले. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. अशीच परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. कोकणचा भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
एवढेच नाही तर धुलीवंदनच्या दिवशी गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर या पावसाचे सावट असल्यामुळे सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. येवला भागातील निफाड, लासलगाव आदी ठिकाणी हा पाऊस कोसळला. याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातही जोरदार पाऊस आला.
शेतकऱ्यांना फटका
शेतमालाला भाव मिळावा म्हणून संघर्ष सुरू असताना शेतकरी अवकाळी पानवसाच्या संकटात सापडला आहे. या दुहेरी संकटातून बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बाजारभावासाठी संघर्ष
कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अभी तो बारीश शुरू हुई है
हवामान खात्याने ५ ते ८ मार्च मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ७ मार्चला गारपिटीचीही शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उकाडा सुरू झाला असताना चार दिवसांच्या पावसाने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Nashik Very Heavy Rainfall Farmers Agri Loss Electricity