त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देव तारी त्याला कोण मारी? ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आयुष्याची दोरी बळकट असली की मृत्यूच्या दाढेतून माणूस सुखरुप परत येतो. त्र्यंबक पंचक्रोशितील लोकांना याचा प्रत्यय आज पुन्हा बघावयास मिळाला. डोक्यावर वीज कोसळूनही महिला जिवंत राहिली. या घटनेची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलले आहे. त्यामुळेच अवकाळी पाऊस, वीजांचा कडकडाट, गारपीट असा अनुभव येत आहे. असेच बदलते हवामान तालुक्यातही आहे. शुक्रवार, दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला. याचवेळी तान्हाबाई पुंडलिक पोटिंदे (वय ६५ वर्षे) या त्यांच्या पिंपळद शिवारातील शेतात होत्या. लाकडे भीजू नये म्हणून ती गोळा करून झाकण्यासाठी त्या शेतातीलच घराबाहेर आल्या.
त्याचक्षणी तान्हाबाईंच्या डोक्यावरून वीज गेली आणि शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडावर कोसळली. वीज डोक्यावरून गेल्याने तान्हाबाईंचे केस आणि अंगावरील लुगडे जळाले. यादुर्घटनेत त्या बेशुद्ध झाल्या. आपली आई बेशुद्ध झाल्याचे पाहून मुलगा सोनू याने तात्काळ त्र्यंबकेश्वर येथील माऊली हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर डॉ. पंकज बोरसे यांनी उपचार केले. तान्ह्या बाई यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना काही त्रास जाणवल्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात येईल अन्यथा येथेच उपचार सुरू ठेवू असे डॉ. पंकज बोरसे यांनी सांगितले. तान्ह्याबाई या मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी परमेश्वराचे आभार मानले आहे..
Nashik Trimbakeshwar Lightening Women Farmer Save Life