नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वसतीगृहातील विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने जवळ असलेल्या चिखलवाडी येथे सर्वहरा परिवर्तन केंद्र आहे. याच ठिकाणच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वहरा परिवर्तन केंद्र ही खासगी शिक्षण संस्था आहे. याच संस्थेचे वसतीगृह आहे. याठिकाणी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आदिवासी व दुर्गम भागातून आणण्यात आले आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचविण्याचा प्रकार घडला आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरातील काही विद्यार्थिनी या संस्थेत शिक्षण घेतात. या विद्यार्थिनी तेथील वसतीगृहात राहतात. संस्थेत पर्यटक आल्यानंतर संस्थेच्या शिक्षकांनी बळजबरीने आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना नाचायला लावले.
खासकरुन शिक्षिका माधुरी गवळी हिने विद्यार्थिनींना दमदाटी केली. छडीने मारहाण केली तसेच जबरदस्तीने नाचविण्यास भाग पाडले. यासंदर्भात विद्यार्थिनींनी पालकांकडे हे सर्व कथन केले. त्यानंतर पालकांनी वाडीवऱ्हे पोलिसांकडे धाव घेतली. तेथे त्यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत पोलिसांनी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा प्रकार गंभीर असल्याने त्याचा तपास उपअधिक्षक संदीप भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पर्यटकांचा राबता
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने परिसर हा पर्यटनासाठी ख्यात आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिणामी, या भागामध्ये पर्यटकांना लागणाऱ्या सोयी-सुविधा पुरवणाऱ्यांची मोठीच रेलचेल आहे.
आयोगाकडेही तक्रार
एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे मधे यांनी सांगितले आहे.
यावर्षीच वसतीगृह
सर्वहरा परिवर्तन केंद्र ही खासगी संस्था आहे. या संस्थेची इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. तसेच, याठिकाणी मुलींसाठी या वर्षापासून वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. वसतीगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनी आहेत. संस्थेची शाळा सहावीपर्यंतच आहे. त्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थिनींना त्र्यंबकेश्वरच्या शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते, असे पालकांनी सांगितले आहे.