नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळी सुट्टीच्या हंगामात तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कारण, एसटी महामंडळाकडून जादा बसेसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकहून बाहेरगावी जाणाऱ्या आणि नाशिकला येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून रोजच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या जादा फेऱ्या १४ एप्रिलपासूनच धावणार आहेत. बहुतांश शाळांना सुट्या लागल्या आहेत. तर, काही शाळांना याच आठवड्यात सुट्या लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गावी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यातच आता महामंडळाने जादा बस फेऱ्यांची घोषणा केली आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला एसटी धावणार आहे. त्यामुळे खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसह मुंबई, पुणे आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, जे प्रवासी कसारामार्गे रेल्वे प्रवास करणार आहेत त्यांचाही महामंडळाने विचार केला आहे. त्यामुळेच नाशिक-कसारा मार्गावर देखील अतिरिक्त फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहे.
Nashik Summer Vacation MSRTC ST Bus Extra Buses