सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खंडागळी सोमठाणे कृष्णा सोमनाथ गीते या १७ वर्षीय तरुणावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. तो पिकांना पाणी देण्यासाठी जात असतांना सकाळी सव्वा सहा वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला, पाठीला, पोटाला गंभीर जखमा झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मेंढी भागांत यांची वस्ती असून वडिलांनी पिकांना पाणी देण्याचे सांगितल्याने तो शेताकडे जात होता. याचवेळी बिबट्याने कृष्णावर हल्ला चढविला. केला. पण, कृष्णाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर कुटुंबियांना कृष्णाला वडांगळीला प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्यावर पोटावर जखमा असल्याने त्याला नाशिक सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर वाढला आहे. नाशिकमध्ये रस्त्यावरुन पायी जाणा-यांवर आठ दिवसापूर्वीच बिबट्याने हल्ला केला. तर दोन दिवसापूर्वी आडगाव येथे एका बंगल्यात बिबट्या मध्यरात्री शिरला. पण, बंगल्यातील कुत्र्यांनी त्याला पिटाळून लावले. वारंवार बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व भीती वाढली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.