सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात इयत्ता 12 वीच्या पेपरचे पर्यवेक्षण करीत असताना किरण भास्कर गवळी (वय ५१ वर्ष) या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळल्याचे पाहून शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. किरण गवळी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
किरण गवळी हे मेकॅनिकल अभियंता होते. गेल्या 25 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेत कार्यरत होते. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्र परिवार आणि विद्यार्थ्यांमध्ये गवळी सर म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी त्यांनी प्रचंड मदत केली. उत्तम वक्ता, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. संस्थेच्या विविध इमारती, लॅब, शिक्षण मार्गदर्शन केंद्र उभारणीसाठी त्यांनी मोठा हातभार लावला.
सिन्नर येथील सहकार क्षेत्रांतील कार्यकर्ते, सिन्नर वैभवकार कै. भास्कर संभाजी गवळी यांचे किरण हे पुत्र होते. किरण यांनी नुकतीच पन्नाशी ओलांडली. त्यानिमित्त सर्व वर्गमित्रांचे गेट टुगेदर सिन्नर येथे झाले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी सविता, मुलगी तारका आणि मुलगा ओम असा परिवार आहे. सर्वस्तरातून किरण यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
Nashik Sinner HSC Exam Teacher Death on Duty