नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरी भागात येणाऱ्या बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकरोडला पादचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. आता दुचाकीवरुन जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. सिन्नर तालुक्यात ही घटना घडली आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२९ जुलै) रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान नायगाव (ता. सिन्नर) येथील शेतकरी विष्णू सोमनाथ तुपे (वय ३० वर्षे) हे शेतातून गावातील घराकडे जात होते. ते दुचाकीवर असतानाच उसाच्या शेतामधून अचानक बिबट्या बाहेर आला. बिबट्याने थेट दुचाकीवरुल तुपे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तुपे हे काहीसे घाबरले. ते जमिनीवर कोसळले. त्याचवेळी त्यांनी दुचाकीच्या कीकने बिबट्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. त्यामुळे बिबट्या पुन्हा उसाच्या शेतात पसार झाला. मात्र, या हल्ल्यात तुपे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.
माहिती मिळताच वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. तुपे यांना उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिकचे पंकज कुमार गर्ग यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर मनीषा जाधव, एस एम बोकडे, वनपरिमंडळ अधिकारी सिन्नर, श्री. एस एल गीते वनरक्षक देशवंडी जी बी पंढरे वनरक्षक वडगाव पिंगळा, वनकर्मचारी, बालम शेख ,श्री.रोहित लोणारे व सरपंच व पोलिस पाटील आदींनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
वनकर्मचाऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. मागणीनुसार, परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे.