सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खंबाळे गावात शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादावादी आणि मारहाणीत अखेर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. माझ्या शेतातून गहू काढण्याचे मशीन का नेतो या कारणातून झालेल्या वादात मशीन घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात एका शेतक-याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सिन्नर पोलिस स्थानकात खंबाळे येथील मारुती बस्तीराम दराडे आणि रामचंद्र नाना दराडे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा मुख्य संशयित फरार आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेतातून मशीन नेल्याच्या कारणातून दराडे व अंकुश यादव आंधळे यांच्यात वाद झाला. या वादातून दराडे यांनी आंधळे यांना मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत अंकुशला सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने नाशिक शहरात उपचारासाठी हलवण्यात आले. पण, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
अंकुश आंधळे यांनी गहू काढण्यासाठी दराडे यांच्या शेतातून हार्वेस्टर नेले होते. ते का नेले म्हणून दराडे यांनी वाद घातला व त्यातून ही मारहाण झाली. त्यात अंकुशचा मृत्यू झाला. सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
Nashik Sinner Crime Farmer Murder Fight