नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर येथील सिन्नर सहकारी संस्थेचा सहाय्यक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. एकनाथ प्रताप पाटील (वय ५७) असे लाचखोराचे नाव आहे. १५ हजार ५०० रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाथरे बुद्रुक येथे ई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. पतसंस्थेने अनेक कर्जदारांना कर्ज दिले आहे. त्यातील काही कर्जदारांनी कर्जाचे हप्ते थकवले आहेत. त्यामुळे पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावण्यासाठी कलम १०१ चे प्रमाणपत्र सहकारी संस्था निबंधकांकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी लाचखोर पाटील याने पतसंस्थेच्या वसुली विभागातील कर्मचाऱ्याकडे लाच मागितली. एका नोटीसचे १५०० रुपये असे १७ नोटीसचे एकूण २५ हजार ५०० रुपयांची लाच हवी असे लाचखोर पाटीलने स्पष्ट केले. याप्रकरणी अखेर एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर पाटील हा १५ हजार ५०० रुपये घेताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी एसीबीने पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
सापळा पथकामध्ये अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, संदीप साळुंखे , पोलीस निरीक्षक, सहा. फौजदार सुखदेव मुरकुटे, पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. मनोज पाटील यांचा समावेश होता. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक आणि नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Nashik Sinner ACB Raid Corruption Bribe Crime