नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना महामारीत सगळे जग ठप्प झाले होते. मात्र, अनेक लोक ध्येयपथावर चालतच होते. यातच समावेश होतो, तो नाशिकमधील सेंट फ्रान्सिस हायस्कूलची विद्यार्थीनी अस्मी सुधीर पेठकर हिचा…तिने या कालावधीत जीवन कौशल्य सुधरवणारे ऑनलाईन 25 छोटे-छोटे कोर्स केले. 55 स्पर्धांत सहभाग नोंदविला. यातून 34 प्रमाणपत्र, सात ट्राॅफी व 10 मेडल मिळविले. विशेष म्हणजे या अनुभवांवर आधारित तिने आपले पहिलेच ई बूक व गोल शीट तयार केले. त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे. आघाडीचे मॅनेजमेंट गुरू व लेखक एन. रघुरामन यांनी तिला फोन करून कौतुक केले. तसेच तिच्यावर लेखन करून ही माहिती कोट्यवधी लोकांपर्यंतही पोहचवली आहे.
नाशिकमधील तिडके काॅलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी अस्मी हिने कोरोना महामारी काळात अनेक कोर्स केले. यात व्हिडिओ मेकींग (05 कोर्स), व्हिडिओ एडीटींग (03 कोर्स), इंग्लिश स्पीकींग (01), ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स (01), कम्युनिकेशन स्कील्स (02), पब्लीक स्पीकिंग (02 कोर्स), यूट्यूब चॅनल (05 कोर्स), बूक रायटींग (02 कोर्स), क्लासिकल व्होकल (01), योगा (01), फिटनेस (1कोर्स), भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य (03 कोर्स), नृत्य योगसूत्र (01), व्हाईट हॅट ज्युनिअर डेमो कोर्स (01) यांचा समावेश आहे.
कोरोना लाॅकडाऊनमध्ये 55 ऑनलाईन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये भाग घेतला. यात कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, योगा, हस्ताक्षर, कोट्स मेकिंग (सुविचार), इंग्लिश ग्रामर, पब्लिक स्पीकिंग आदी विषयांचा समावेश आहे. तसेच अस्मी ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण मागील 08 वर्षांपासून घेत आहे.
असे आहे ई बूक व गोल शीट
अस्मीने कोराना काळातील अनुभवावर आधारित हाऊ कोविड पॅडेमिक चेंज्ड माय लाईफ हे ई-बूक लिहिले आहे. तसेच याच काळात पाॅवर पाॅईंटमध्ये गोल शीट लिहिले आहे. त्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणते शिक्षण घ्यायचे, आपले करिअर कशात आहे सविस्तर मांडले आहे. तिला शालेय शिक्षिका, भरतनाट्यम नृत्यांगणा, योगशिक्षक, प्रेरणादायी वक्ता, लेखिका हे बनायची महत्त्वाकांक्षा आहे.
यांचे मार्गदर्शन लाभले
नवीन स्कील्डस् आत्मसात करण्यात अस्मीला पुणे येथील सागर लाईफ स्कूलचे प्रमुख व प्रेरणादायी वक्ते सागर गारवे, मुख्याध्यापिका रंजीतकौर संधू, वर्गशिक्षक अमित कुलकर्णी, माजी मुख्याध्यापिका कुसुमा शेट्टी, भरतनाट्यम गुरू डाॅ. संगीता पेठकर व कुटूंबियांचे मार्गदर्शन लाभत आहे.
हे खरे आहे की, महामारीत बहुतेक मुले शाळेत शिकविल्या जाणाऱ्या विषयांसह जीवन कौशल्ये शिकण्यापासून वंचित राहिले. मात्र, अनेक असेही होते, ज्यांनी या महामारीत लाभ उठविला. जसे की नाशिकच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील 14 वर्षांची अस्मी सुधीर पेठकर. जेव्हा ती 12 वर्षांची होती व सातवीत शिकत होती तेव्हा कोविडमुळे तिचे शिक्षण ऑनलाईन शिफ्ट झाले. मात्र, तिने लाईफ स्कील्ड सुधरवणारे कोर्स केले. या वयात अनेक मुलांनी पुस्तके लिहिली असतील. त्यामुळे अस्मीच्या पहिल्या ई बूकने मला चकीत केले नाही. मात्र, तिच्या द्वारा तयार केलेल्या गोल शीटने माझे लक्ष वेधले. तिने एक निश्चित प्लॅन तयार करून ठेवला आहे की, तिला कोणत्या वयात काय बनायचे आहे. ती एकटी अशी मुलगी आहे, जिने मला शिकवले की पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन फाॅर्ममध्येही गोल-शीट बनवली जाऊ शकते आणि ते कोणालाही मोबाईल फोनवर दाखविले जाऊ शकते.
– एन. रघुरामन, प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू व लेखक