नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विश्व मल्लखांब संघटनेतर्फे मुंबई येथे २८ व २९ जानेवारीत ३ ऱ्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच परीक्षा आणि प्रशिक्षण वर्ग याचे आयोजन करण्यात आले होते. या पंच परीक्षेत नाशिकच्या व्यायाम शाळेची राष्ट्रीय खेळाडू कु. साक्षी नितीन गर्गे हिने सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिक जिल्ह्यातील १ ली आंतरराष्ट्रीय महिला मल्लखांब पंच म्हणून मान मिळविला आहे. परिणामी, मल्लखांब क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात नविन मानाचा तुरा रोवला आहे.
जानेवारीमध्ये आयोजित या पंच परीक्षेमध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कु. साक्षी ही १५ वर्षांहून अधिक काळ यशवंत व्यायाम शाळेची विद्यार्थीनी असून तिला दीपक पाटील आणि यशवंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
साक्षीच्या या यशाबद्दल नाशिक मल्लखांब असोसिएशन आणि यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, मल्लखांबाचे प्रशिक्षक यशवंत जाधव, व्यायाम शाळेचे कार्यकारी मंडळ आणि सभासदांकडून कु. साक्षीला शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640566501890736128?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640566467774255105?s=20
Nashik Sakshi Garge International Umpire for Mallakhamb