नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेमार्फत मागील तीन वर्षात रस्त्यांच्या कामांकरिता एकूण रु.४८९.७२ कोटी खर्च करण्यात आला असून दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया नाशिक महानगरपालिकेमार्फत सुरु आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तरातून दिली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहीन असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये नाशिक महानगरपालिकेने गेल्या अडीच वर्षात रस्त्यांच्या कामासाठी सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्च करुन देखील पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून माहे सप्टेंबर २०२२ मध्ये वा त्यादरम्यान आंदोलने करण्यात आली आहेत. नाशिक शहरातील रस्त्याच्या कामांची गुणवत्ता दर्जाहीन असल्याबाबत नाशिक महानगरपालिकेला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या रस्त्याच्या कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाची असल्यामुळे शासनाने या तक्रारींची चौकशी केली आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला होता.
त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे विविध संघटनांकडून महानगरपालिकेस निवेदने प्राप्त झाली असून, याबाबत आंदोलने करण्यात आली ही बाब खरी आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत मागील तीन वर्षात रस्त्यांच्या कामांकरिता एकूण रु.४८९.७२ कोटी खर्च करण्यात आलेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक शहरामध्ये सद्यस्थितीत भुयारी गटारींची कामे, पाणीपुरवठ्याची कामे, भुमीगत MNGL गॅस पाईपलाईन, रिलायन्स, एअरटेल, जिओ फायबर इत्यादी कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकामे सुरु असल्यामुळे, त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुध्दा अनेक विकास कामे सुरु असल्याने, नागरिकांच्या तक्रारी व निवेदने महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहेत. नाशिक महानगरपालिकेमार्फत रस्त्यांची कामे करतांना सदर कामे गुणवत्तापुर्वक होण्याच्या दृष्टीने पुरेपुर दक्षता घेण्यात येते. तसेच, नगर विकास विभाग, शासन निर्णय, दि.२८/०३/२०१८ नुसार कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक या संस्थेची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कामांचे गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था नेमणुकीची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली आहे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
Nashik Road Work Expenses CM Shinde in Assembly