पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात बरेचदा दोनच कारणांनी प्रकल्प रखडत असतात. एकतर प्रशासकीय दिरंगाईमुळे नाहीतर सरकारने निधी उपलब्ध करून दिला नाही म्हणून. पुणे-नाशिक रेल्वे मार्ग सध्या अश्याच एका कारणाने रखडला आहे.
पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील भूसंपादन केले जाणार आहे. एकूण १ हजार ४७० हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधून ५७५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निघाले आणि कार्यवाही सुरू झाली. राज्य शासनाच्या निधीतून भूसंपादन करण्यात आले. आता पुढील भूसंपादन रेल्वे प्रशासनाने करावे, यासाठी निधीची मागणी करण्यात आली. पण
रेल्वेकडून निधी प्राप्त झालेला नसल्याने भूसंपादन थांबविण्यात आले आहे. या प्रकल्पाला नाशिक आणि नगर जिल्ह्यात विरोध झाला होता. सुरुवातीला जमिनी देण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे सुद्धा प्रक्रिया रखडली होती. पण त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र आता रेल्वेने निधी उपलब्ध करून दिला नाही म्हणून प्रक्रिया रखडली आहे. पुणे जिल्ह्यात प्रकल्पासाठी आवश्यक जागा थेट खरेदीने संपादित करण्यास सुरुवात करण्यात आली होती. नगर आणि नाशिक जिल्ह्यांपेक्षा पुण्याने भूसंपादनात आघाडी घेतली होती. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांनी आवश्यक जमीन मोजणी केली असून, शोध अहवालही तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन मार्ग तयार करण्यात येणार असून, पुणे-नाशिक अंतर दोन तासांवर येणार आहे.
थेट खरेदीचा प्रस्ताव
प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक १२०० ते १५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
औद्योगिक महामार्ग
तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेने या प्रकल्पाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वेमार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या आहेत. तसेच नाशिक-पुणे महामार्गालगत औद्योगिक महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे.
Nashik Pune Highspeed Railway Project