नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घातक नायलॉन मांजा विक्री, साठवणूक यावर बंदी असली तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळेच शहर परिसरात विविध घटना घडत आहेत. याची अखेर गंभीर दखल नाशिक पोलिसांनी घेतली आहे. शहरातील चार विक्रेत्यांवर थेट तडीपारीची कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत.
नाशिक पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा प्रकरणी आता अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. बंदीचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने थेट तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी अंबड परिसरातील ४ विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये अजिंक्य प्रदीप भिसे (वय ३४, त्रिमूर्ती चौक, सिडको), बाळासाहेब खंडेराव राहींज (वय ४१, चरणदास मार्केट, संत ज्ञानेश्वर नगर, जेलरोड, नाशिकरोड), समाधान राजेंद्र मोरासकर (वय १९, गणेश चौक, सिडको), हेमंत वीरेंद्र काला (वय १९, हेडगेवार नगर, सिडको) या चार विक्रेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, नायलॉन मांजा बंदीचे कसोशीने पालन करावे. अन्यथा यापुढील काळात यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त शिंदे आणि उपायुक्त खांडवी यांनी दिला आहे.
Nashik Nylon Manja Ban Police Strict Action Crime Tadipar