नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या वतीने वृक्षतोड विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काठेगल्लीतील विद्यालयासह मंगल कार्यालय आवारात परवानगी न घेताच वृक्षतोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकासह मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाचे सचिन देवरे यांनी याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत. तिगराणीया रोडवरील काशी माळी मंगल कार्यालय आवारातील गुलमोहराचे एक झाड परवानगी न घेताच बुंध्यासकट तोडण्यात आल्याचे पाहणीत आढळून आले आहे. व्यवस्थापनाने २७ डिसेंबर रोजी झाड तोडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वृक्षतोडीची दुसरी घटना त्रिकोणी गार्डन भागात निदर्शनास आली. रविंद्रनाथ टागोर विद्यालय मानिकशानगर या शाळेच्या आवारातील ख्रिसमस,अशोक,गुलमोहर व कडूनिंबाचे प्रत्येकी एक झाडा महापालिकेची परवानगी न घेताच तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. शाळा व्यवस्थापनाने गेल्या ५ जानेवारी रोजी ही झाडे बेकायदा तोडली असून दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.
Nashik NMC Illegal Tree Cutting FIR