नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीला ऊत आला असून गेल्या काही दिवसांपासून सतत लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडत आहेत. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली एसीबीने आक्रमकपणे लाचखोरांवर बडगा उगारला आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यात मोठ्या संख्येने लाचखोर रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यात क्लास वन अधिकाऱ्यांपासून कंत्राटी कामगार आणि खासगी एजंट यांचाही समावेश आहे. आता उत्पादन शुल्क विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यात हप्तेखोरी करणारे तिघे सापळ्यात अडकले आहेत. लोकेश संजय गायकवाड (वय ३५, जवान, राज्य उत्पादन शुल्क, फिरते पथक, नाशिक), श्री. पंडित रामभाऊ शिंदे (वय ६०, एक्साईज अकाउंटिंग, रा. निफाड), श्री प्रवीण साहेबराव ठोंबरे (वय ४७, एक्साईज अकाउंटिंग रा. निफाड) अशी या तिन्ही लाचखोरांची नावे आहेत. उत्पादन शुल्कच्या फिरत्या पथकावर असलेल्या जवानासह दोन खासगी एजंट जेरबंद झाल्याने विभागातील गैरकारभार आता आणखी समोर येण्याची चिन्हे आहेत.
निफाड तालुक्यातील एका बार अँड रेस्टॉरंट चालविणाऱ्या व्यवसायिकाकडे या तिघा लाचखोरांनी ९ हजार रुपयांची लाच माहितली होती. हॉटेल व्यवसाय कामात त्रुटी न काढणे, परवाना सुरळीत चालू ठेवणे या मोबदल्यात वार्षिक हप्ता म्हणून ही लाच मागण्यात आली होती. या व्यावसायिकाचे एकूण ३ हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलचे ४ हजार असे एकूण १२ हजार रुपये मागितले. अखेर तडजोडी अंती ९ हजार रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाले. यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात ठोंबरे हा लाच घेताना रंगेहाथ पकडले गेला. आणि याप्रकरणी ठोंबरे, शिंदे आणि गायकवाड या तिघांवर गुन्हा दाखल करण्याच ेकाम सुरू आहे.
पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. सापळा पथकामध्ये पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, नितीन कराड, चालक परशराम जाधव यांचा समावेश होता.
एसीबीने आवाहन केले आहे की, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Nashik Niphad ACB Raid Bribe State Excise Corruption