नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन खरेदी विक्रीत मुळ मालकाची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत कर्जाची परतफेड न करता वाहन परस्पर अन्य दोघांना विक्री करण्यात आले असून फायनान्स कंपनीचे थकबाकीसाठी मुळ मालकाकडे तगादा लावल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहिन सलीम कुरेशी (रा.भारतनगर) व सलमान उस्मान शेख (रा.वडाळागाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आकाश प्रेमनाथ गायकवाड (रा.सावळसुर जि.उमरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांनी चोला मंडलम फायनान्स कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेला आयशर प्रो एमएच २५ एजे ४६४८ या वाहनाचा व्यवहार संशयित कुरेशी या एजंटच्या माध्यमातून शेख याच्याशी करण्यात आला होता.
गेल्या २६ जून रोजी याबाबत नाशिकरोड येथे अॅड.पदमावती थोरात याच्याकडून नोटरी करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्यात फायनान्स कंपनीचे उर्वरीत हप्ते वाहन खरेदीदाराने भरण्याचे ठरल्याने संशयितांनी या व्यवहारात दोन लाखाची रोकड टोकन म्हणून देत उर्वरीत १९ लाख ८० हजाराची रक्कम परस्पर हप्ते भरण्याची ग्वाही दिली होती. मात्र संशयित शेख याने हप्ते न भरता वाहन अझहर युनिस मनियार यास व त्याने मोहम्मद अशरफ मन्सुरी यास विक्री केले.
फायनान्स कंपनीस हप्ता प्राप्त न झाल्याने विश्वासघाताचा हा प्रकार समोर आला असून कंपनीकडून हप्त्यासाठी तगादा लागल्याने गायकवाड यांनी चौकशी केली असता वाहन परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.