नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राणी भवन आणि नर्मदालयातर्फे ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर पाच दिवशीय व्याख्यानमाला १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक येथील राणी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत ही व्याख्यानमाला संपन्न होणार असून प्रव्राजिका विशुध्दानंदा (भारती ठाकुर ) या व्याख्यानमालेत वाल्मीकि रामायण व वर्तमान युग यामधील संदर्भ उलगडून सांगणार आहे.
देशातील वेगवेगळ्या शहारात ही व्याख्यानमाला संपन्न झाली असून या व्याख्यानमालेतील विषयामागील पार्श्वभूमी सांगतांना प्रव्राजिका विशुध्दानंदा (भारती ठाकुर ) यांनी माहिती दिली, नर्मदालयातल्या काही विद्यार्थ्यांनी एकदा मला प्रश्न विचारला, “हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या रामायणातल्या कथा आता एकविसाव्या शतकात का वाचायच्या ? आजच्या काळाशी त्याचा काय संबंध ? या प्रश्नांचं एका वाक्यात उत्तर देऊन चालणार नव्हतं. युवा पिढीला रामायण कथेतून नेमकं काय घेण्यासारखं आहे ? वर्तमान युगाच्या संदर्भात त्याची सांगड कशी घालायची ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा एकदा वाल्मिकी रामायण वाचायला सुरुवात केली. त्यावर अनेक विद्वानांनी दिलेल्या व्याख्यानांचे संकलनही उपलब्ध होते. त्यात मुख्यत्वे करून प्रसिद्ध जलतज्ज्ञ श्री माधवराव चितळे आणि स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या पुस्तकांचा मूळ वाल्मिकी रामायण समजून घेतांना उपयोग झाला.
रामायण कथा ही फक्त श्रीरामांची नाही तर ती तितकीच सीतेची देखील आहे. तशीच ती लक्ष्मण, भरत शत्रुघ्न यांची आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची आहे. श्रीमान हनुमानाची – त्याच्या समर्पण भावाची, त्यागाची सुद्धा आहे. ह्या कथेत खलनायक असलेल्या रावणाची पण ही कथा आहे. सुग्रीव असो वा बिभीषण – प्रत्येकाची त्यात महत्वाची भूमिका आहे. कोविडपूर्वीही मी वाल्मिकी रामायणावर व्याख्याने दिली होती. कोविडने दिलेल्या निवांतपणात ‘वाल्मिकी रामायणाचा सध्याच्या परिस्थितीत अभ्यास का करायचा’ याची उत्तरं शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर काही मुद्दे लक्षात आले. वर्तमान युगाच्या संदर्भात रामायण का वाचायचं ? फक्त मनोरंजनासाठीची कथा म्हणून नाही तर –
१) रामायण काळातील राज्यकारभार, शिष्टाचार आणि प्रशासन व्यवस्था समजावून घेण्यासाठी. महर्षी वशिष्ठ म्हणतात की राम कसा आहे ? तर रामो विग्रहवान धर्म: | मानवी जीवनातल्या उत्तुंग गुणांचं साक्षात साकार दर्शन म्हणजे श्रीराम. परिस्थितीने रामाला आयुष्यात वारंवार धक्के दिले आहेत. पण त्यावर मात करून स्वत:चं, समाजाचं आणि पर्यायाने संपूर्ण राष्ट्राचं चारित्र्य कसं घडवायचं, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला शांतपणे सामोरं कसं जायचं ते शिकण्यासाठी आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत समजून घेण्यासाठी.
२) राजकुमार आणि भावी राजा असूनही सामान्य नागरिकांशी श्रीरामांची वागणूक कशी होती ते जाणून घेण्यासाठी तसेच श्रीरामांच्या अनेक गुणविशेषांचा अभ्यास करण्यासाठी.
३) श्रीरामांच्या आणि सुग्रीवाच्या संघटन कौशल्याचा, तत्कालीन प्रगत विज्ञानाचा, भौगोलिक परिस्थितीचा, पर्यावरणाचा, वनवासी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी.
४) श्री. भरत, शत्रुघ्न, हनुमान आणि बिभीषणाचा त्याग, समर्पण भाव समजून घेण्यासाठी.
५) भगीरथ प्रयत्न म्हणजे काय ? भगीरथाचे पाणी व्यवस्थापन कसे होते ? गंगा या पृथ्वीवर खरंच कशी अवतरली हे समजून घेण्यासाठी.
६) रावणाचं युद्ध कौशल्य, विद्वत्ता आणि त्याच्या राजधानीची सुरक्षा व्यवस्था याच्या जोडीने त्याची विकृत मनोवृत्ती त्याच्या मृत्युला आणि सर्वनाशाला कशी कारणीभूत ठरली हे समजून घेण्यासाठी.
७) आतंकवाद ही काही २० -२१ व्या शतकाची निर्मिती नाही तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली एक प्रवृत्ती आहे. धर्म आणि अधर्म यातली लढाई समजून घेण्यासाठी.
वाल्मीकि रामायण वाचत असतांना जाणवलं, की हे सगळं तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून त्यादृष्टीने ‘वाल्मीकि रामायण – वर्तमान युगाच्या संदर्भात’ या विषयावर व्याख्यानमाला वेगवेगळ्या संस्थांमध्ये आयोजित होत आहेत.