नाशिक – उद्योग मंत्री सुभाष देसाई नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीमधील अनिश फार्मा या कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता यावेळी आय़माच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्र्यांनी लवकरच अजून दोन मोठ्या उद्योगाची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगितले.
या भेटीत आयमा पदाधिका-यांनी उद्योजकांच्या विविध मागण्या व सूचनान बाबत सविस्तर निवेदन उद्योगमंत्र्यांना देऊन विविध विषयांवर चर्चाही केली. याचर्चेत प्रामुख्याने उद्योजकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पांजरापोळ येथील अतिरिक्त जागा भूसंपादन बाबत विषय उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. ही जागा नाशिक मधील उद्योग विस्ताराकरता कशी मिळेल या करता प्रयत्न करावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी याबाबत आपण मुंबईला यावे आपण स्वतंत्र बैठक लावू असेही सांगितले, तसेच सीईटीपी हा जो प्रकल्प अंबड येथे प्रस्तावित आहे. त्याबाबतही उद्योगमंत्र्यांना सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या व याकरता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन हा प्रकल्प मार्गी लावावा अशी विनंती आयमातर्फे करण्यात आली.
नाशिक मधील उद्योगांबाबतच्या इतर काही सूचना व समस्यांबाबत मुंबईला स्वतंत्र वेळ देण्याचे उद्योगमंत्र्यांनी मान्य केले. आयमा पदाधिकाऱ्यांना आमंत्रण देऊन यावर आपण नक्कीच चांगल्या प्रकारे तोडगा काढून हे प्रश्न सर्व मार्गी लावू व राज्य सरकार, एमआयडीसी व उद्योग विभाग हा संपूर्णपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचे ठोस आश्वासन उद्योगमंत्री देसाई यांनी दिले. या भेटीप्रसंगी आयमा विश्वस्त समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा उपाध्यक्ष निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे,सरचिटणीस ललित बुब,तसेच एममायडी सीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, बोरसे, तसेच उद्योग विभागाचे सह संचालक राजपूत साहेब, जिल्हा उद्योग केंद्राचे गवळी साहेब, दंडगव्हाळ, दवंगे, उद्योग विभागाचे सहसचिव नितीन शिंदे आदी अधिकारी व अनिश फार्मा चे संचालक रवींद्र सामंत व सामंत बंधू उपस्थित होते.