नाशिक – स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांची गैरसोय होऊ देणार नसल्याची भावना आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जुने नाशिक भागातील दहीपुल परिसर येथे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या पाहणी दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांनी हे मत व्यक्त केले.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या जुने नाशिक भागातील मेन रोड व दही पूल परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण व गटारी तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आलेले आहे. योजनेअंतर्गत सदर काम सुरू करण्यापूर्वी शहरातील लोकप्रतिनिधींना विचारात न घेता सदर कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कामाबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे प्राप्त झाल्या. आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी यांच्यासमवेत सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी दहीपूल परिसरात रस्त्याचे काम हे आत्ता असणाऱ्या रस्त्याच्या उंची पासून एक मीटर खाली होणार आहे. यासाठी नव्याने गटार योजना देखील करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे परिसरातील नागरिकांचे व शेकडो वर्षे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने जुने नाशिक भागात चार एफएसआय देऊन परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी क्लस्टर विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती. नाशिक महानगरपालिकेने टेंडर प्रक्रिया करून याबाबत सर्व्हे करून प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते प्रस्तावित करताना महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्मार्ट योजनेअंतर्गत होणारा खर्च वाया जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
आमदार देवयानी फरांदे यांच्या दौऱ्या दरम्यान अनेक स्थानिक नागरिकांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत असंतोष व्यक्त करताना यामुळे दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट करताना पुराचा धोका देखील वाढणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह उपस्थित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली.
नागरिकांच्या तक्रारी विचारात घेऊन सर्व समावेशक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. याबाबत बुधवार २४ जून २०२१ रोजी संबंधित नागरिकांनी समवेत योजनेच्या कार्यालयात बैठक घेण्याचे आदेश देखील आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.
यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासोबत शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता, संजय बच्छाव, स्मार्ट सिटी योजनेचे मॅनेजर पाटील, नगरसेवक अजिंक्य साने, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, शिवा जाधव, प्रतीक शुक्ल, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजार होते