नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या उद्योग जगतासाठी एक आनंदाची बातमी आहे. एबीबी या बहुराष्ट्रीय कंपनीने नाशिकमध्ये विस्तार केल्यानंतर आता आणखी एका बहुराष्ट्रीय कंपनीने निर्णय घेतला आहे. लाइफस्टाइल बॅग आणि ट्रॅव्हल लगेज उत्पादक सॅमसोनाइट साउथ एशिया या कंपनीने नाशिक प्लांटच्या विस्ताराची घोषणा केली आहे. याद्वारे कंपनी दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
मुंबई-आग्रा हायवेवर नाशिक शहरालगत गोंदे येथे सॅमसोनाईट कंपनीचा प्लांट आहे. कंपनीला भारतासह दक्षिण आशियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आता कंपनीने विस्ताराची योजना आखली आहे. याचाच एक भाग म्हणून १ लाख ८० हजार चौफुट एवढे बांधकाम करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. हे बांधकाम काम या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. हार्ड लगेज उत्पादन क्षमतेसाठी ११० ते ११५ कोटी रुपयांची नियोजित गुंतवणूक केली जाईल. स्वयंचलित गोदामांसाठी ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
सद्यस्थितीत कंपनी या प्लांटमधून वर्षाकाटी ५ लाख बॅगा तयार करते. विस्तार केल्यानंतर पुढील वर्षाच्या अखेरीस ही क्षमता ७.५ लाख होईल. आणि पुढील वर्षाच्या अखेरीस हीच क्षमता थेट १० लाख एवढी होणार आहे. यासाठी नवीन कारखान्यांसाठी इतर राज्यांच्या व्यवहार्यतेचा शोध घेतला जाईल.
सॅमसोनाइट कंपनीने अलीकडेच बिहारमधील दरभंगा येथे एक किरकोळ आउटलेट उघडले आहे, तसेच बिहारमध्ये कटिहार आणि मुझफ्फरपूर येथे स्टोअर लॉन्च करण्याची पुढील योजना आहेत. याद्वारे कंपनीच्या मालकीच्या स्टोअरची संख्या ६५ पर्यंत जाईल. या वर्षाच्या अखेरीस एकूण ६०० रिटेल स्टोअर्सचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. ट्रॅव्हल लगेज उद्योग पुढील १० वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कंपनी नियोजन करीत आहे.
Nashik Multinational Company Expansion Investment