नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादप्रमाणे आयोजित मडबाथचा (माती स्नानाचा) अबाल वृद्धांसह हजारो लोकांनी आनंद लुटला.संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला.लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गमभागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटत होते.आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.
महेशभाई शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 26 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता.मात्र गेल्यावर्षांपासून पुन्हा हा उत्सव सुरू झाला.या वर्षीसुद्धा लोकांचा उत्साह दांडगा दिसला. मुंबई,पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे 1000 लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. हनुमानजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.त्यानुसार 9 एप्रिलला हा उत्सव साजरा करण्यात आला.
महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते.वारुळाची माती गोळा केली जाते.आठ दिवस आधी ती भिजवली जाते.संपूर्ण शरीराला ती लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते,असे नंदू देसाई यांनी सांगितले.
सकाळी 5.45 वाजेपासून हा कार्यक्रम सुरु झाला.बघता बघता लोकांचे थवेच्या थवे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले.पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरित्या तो फासावा लागत होता .मात्र यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता आणि त्यात चिखल होता.या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते.नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.
मडबाथ घेणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल,प्रदीप पाटील,एड.धर्मेंद्र चव्हाण डॉ.ज्ञानेश्वर चोपडे,वैभव शेटे, अमित घुगे,ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे,योगेश कमोद, किशोर बेलसरे, संदीप जाधव,विजय पाटील,मनोज देसाई,गौरव देसाई,यश देसाई,नंदू पाटील,विशाल पाटील,विक्रांत मोरणकार, किशोर माने,अविनाश लोखंडे,सुरेश डोंगरे,चंद्रकांत नाईक,रविंद्र दुसाने, नितीन रौनदळ,अजय गुजर, अनिल भिसे,बाळा घाडीगावकर,सतीश मुंदडा, प्रवीण संचेती,अभय कटारिया,किरणं जगताप, दीपक भोसले,मिलिंद राजगुरू आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रूप, जल्लोष ग्रूप,पंचवटी व्यापारी ग्रूप,नाशिक इको ड्राईव्ह, चामरलेणी इको ड्राईव्ह, मुंबई ग्रुप आदी ग्रुपचे सदस्य आदींचा समावेश होता. पंढरपूरहून आलेले सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यही यात सहभागी झाले होते. मडबाथनंतर मिसळपार्टीचाही सर्वांनी आनंद लुटला.
खूप छान अनुभव
नाशकात मडबाथचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मला आमंत्रित केल्याचे समजल्यानंतर त्याचा आनंद लुटण्यासाठी मी आवर्जून आलो आणि माझ्यासाठी हा सुखद धक्काच ठरला. शेकडो लोकांना आमंत्रित करून इतका चांगला उपक्रम आणि त्यानंतर मिसळपार्टी म्हणजे सारेकाही अभूतपूर्वच म्हणावे लागेल.यापूर्वीही मी याचा आनंद अनेकदा लुटला आहे.
– हरिष बैजल, आयपीएस अधिकारी
Nashik Mud bath Celebration IPS Officer