नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला प्रवाशांचे हित लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अर्ध टिकीट योजनेचा लाभ महिन्याभरात जिल्ह्यातील २१ लाख महिलांनी घेतला आहे.लाभार्थींच्या तुलनेत जिल्ह्यातील कळवण डेपो अव्वल असून शेवटचा क्रमांक पेठ डेपोचा आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या अर्ध्या टिकीटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील एकवीस लाख महिला लाभार्थींचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असून हे मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे यश असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
राज्यातील महिलांचा एस.टी प्रवास कमीत कमी टिकीट दरात व्हावा अशी मागणी विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सतत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे होत होती.महिला संघटनांकडून होत असलेली मागणी न्यायिक असल्याने महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांना टिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील महिला वर्गाने जंगी स्वागत केले होते.
गेल्या महिन्यात १७ मार्चपासून एस.टी प्रवासासाठी महिलांना अर्ध्या टिकीट योजना सुरू करण्यात आली होती.महिन्याभरात या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २१ लाख महिला प्रवाशांना झाल्याचे समोर आले आहे.पैकी नाशिक-१ डेपोतील ११८९०७, नाशिक-२ डेपोतील २२०५४५, मालेगांव डेपोतील १८८७३४,मनमाड डेपोतील ९५८१७, सटाणा डेपोतील २३७१११,सिन्नर डेपोतील २२७८८६, नांदगाव डेपोतील १४९१५७, ईगतपुरी डेपोतील १०४२५५, लासलगांव डेपोतील १४२१४७, कळवण डेपोतील २७२७६५, पेठ डेपोतील ९५९३५, येवला डेपोतील १०७१२०, पिंपळगांव डेपोतील १४५५९२ महिला प्रवाशांनी लाभ घेतल्याची माहिती जिल्हा नियंत्रक (डी.सी) अरूण सिया यांनी दिली आहे.
सर्वाधिक लाभ कळवण डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला असून त्या खालोखाल सिन्नर डेपोतून प्रवास करणाऱ्या महिलांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्धे टिकीट योजनेमुळे महिन्याभरात जिल्ह्यातील महिला प्रवाशांचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपये वाचले असून सरकारच्या निर्णयाचे हे मोठे यश असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
Nashik MSRTC ST Bus Half Ticket Women Benefit