मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळयातच मनमाड शहरावर पुन्हा पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले असून शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे शहराला ऐन पावसाळ्यात २२ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. अद्याप जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दमदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाई अधिक गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मनमाड शहराला दिंडोरी तालुकयातील पालखेड धरण समूहातून कालव्याव्दारे पाणी मिळते. त्यामुळे या धरणातील पुढील आवर्तनावर आता मनमाडकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. याअगोदरही मनमाडवरांनी अनेक वेळा पाणीटंचाईचा सामना केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे धरणात इतर ठिकाणाहून येणारे पाणी कमी असते.
मनमाड शहराला भासणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेवून आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने ३१२ कोटी रुपये खर्चाची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे झाले. त्यानंतर या योजनेचे कामही जोात सुरु आहे. पण, हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत मनमाडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या मनमाड शहारात ऐन पावसाळ्यातही २२ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे राज्यातले पाणी टंचाईशी झुंजत असणारे हे एकमेव शहर आहे. तब्बल ४० वर्षांपासून पाण्यासाठी स्थानिक संघर्ष सुरु आहे. यामुळे आजही मनमाडकरांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. वर्षभर कधी चार दिवस तर कधी आठवडाभरानंतर पाणीपुरवठा करणारी मनमाड ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद आहे. रेल्वे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवून ठेवणारे, डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आणि शीख धमिर्यांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख असली तरी पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते.
या शहराला ७४ कि.मी अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळते या पाण्यावरच शहराला पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. पालखेड धरणात मनमाडसाठी पाणी राखीव आहे. पण, हे पाणी पूर्णक्षमतेने उचलता येत नाही. त्यामुळे मनमाड शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. आता राज्य शासनाने थेट पालखेडहून वागदर्डी धरण ही ३१२ कोटीची योजना मंजुर केली. तिचे कामही जोरात सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मनमाडकारांना दिलासा मिळेत. पण, तोपर्यंत पाणीटंचाईचा सामना मनमाडकरांना करावा लागणार आहे.
Nashik Manmad Water Scarcity Supply 22 Days Rainy Season
District Shortage Palkhed Dam